आंतरराष्ट्रीय शाळेचे नावच आले ‘वांद्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 09:41 PM2018-12-23T21:41:15+5:302018-12-23T21:42:11+5:30

महाराष्ट्रात १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्यात आल्या. या १३ ही शाळांचे लोकार्पण मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. या सर्व शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नाव देण्याच्या सूचना राज्यसरकार कडून देण्यात आल्या होत्या.

International school named 'Vandya' | आंतरराष्ट्रीय शाळेचे नावच आले ‘वांद्यात’

आंतरराष्ट्रीय शाळेचे नावच आले ‘वांद्यात’

googlenewsNext
ठळक मुद्देविदेशातील शिक्षण मिळणार : शहीद जान्या तिम्याचं नाव कायम ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रात १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्यात आल्या. या १३ ही शाळांचे लोकार्पण मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. या सर्व शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नाव देण्याच्या सूचना राज्यसरकार कडून देण्यात आल्या होत्या. परंतु गोरेगाव येथे तयार होणाऱ्या या शाळेत नावाला घेऊन वाद निर्माण झाला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नावाऐवजी शहीद जान्या तिम्या आंतरराष्ट्रीय शाळा हेच नाव कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.
शासकीय शाळांना आता चांगले दिवस यावे, मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सत्र २०१८-१९ पासून सुरूवात करण्यात येत आहे. २५ विद्यार्थ्यांना नर्सरी ते केजी-२ चे शिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस शाळेच्या अंतर्गत नऊ तेजस आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्यात येईल असे शासनाचे म्हणणे होते. परंतु या तेजस शाळासंदर्भात विचार करण्यात आला नाही. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेतला होता. २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील १३ ही शाळांचे नामकरण व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे तयार करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय शाळेला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण करण्यात येणार होते. लोकार्पण कार्यक्रमाला उदघाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी राहणार आहेत. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला घेऊन गोरेगावतील काही लोकांनी तिव्र विरोध दर्शविला.त्यामुळे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागी त्या शाळेचे जूनेच नाव शहीद जान्या-तिम्या आंतरराष्ट्रीय शाळाच राहणार असल्याचे जवळ-जवळ निश्चीत मानले जात आहे.

पत्रिका, बॅनर्स व नामफलक बदलणार
दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या आंतरराष्ट्रीय शाळा लोकार्पण कार्यक्रमाच्या ५०० पत्रिका शिक्षण विभागाने छापून त्या वाटपही केल्या. त्या पत्रिकेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असे नाव देण्यात आले आहे. परंतु त्या पत्रिका गोरेगावातील लोकांच्या हातात पडल्याने त्यांनी तिव्र विरोध दर्शविला. परिणामी शिक्षण विभागाने जूनेच नाव देण्याचे ठरविले आहे. या नावाच्या घोळाला घेऊन प्रकरण मुंबईपर्यंत पोहचले. त्यामुळे मुंबईवरून झालेल्या हालचालीवरून हे नाव बदलल्याचे कळते. तीन होर्डिंग, ५०० पत्रिका व नामफलक बदलविण्याची प्रक्रीया शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
आनंददायी शिक्षण; पण नावासाठी वाद
शासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, दर्र्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण, प्रशस्त वर्गखोल्या, मोठी पटांगण, खेळणी साहित्य, तज्ज्ञ महिला शिक्षिका, डिजीटल शिक्षण, वाहतूक व्यवस्था व आनंददायी कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे. लोकसहभागावर ही शाळा चालणार आहे.या शाळेसाठी राज्यस्तरीय संस्थेकडून चाचणी परीक्षेद्वारे गुणवंत शिक्षकांची निवड जात आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.आनंददायी पध्दतीतून देण्यात येणाºया शाळेच्या नावासाठी वाद निर्माण झाला आहे.

Web Title: International school named 'Vandya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा