३५७ ग्रामपंचायतींमध्ये लागले इंरटनेट कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:42+5:302021-04-12T04:26:42+5:30
गोंदिया : प्रत्येक ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन पध्दतीने नागरिकांची कामे व्हावीत, यासाठी भारत नेट प्रकल्पातून देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींत इंटरनेट लावले ...
गोंदिया : प्रत्येक ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन पध्दतीने नागरिकांची कामे व्हावीत, यासाठी भारत नेट प्रकल्पातून देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींत इंटरनेट लावले जात आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींचा समावेश असून, आतापर्यंत ३५७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्शन लावण्यात आले आहे.
महाराष्ट्र व गोवाचे नियंत्रक अनिल प्रतापराव साळुंके यांच्या भारत नेट प्रकल्पअंतर्गत देशातील दोन लाख ५० हजार ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्थापन करण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलव्दारे जोडण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक - अर्जुनी, अर्जुनी - मोरगाव, देवरी, सालेकसा व आमगाव या ८ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भारत नेट फेज-१ अंतर्गत इंटरनेट कनेक्टिव्हिटी जोडणी करण्यात आली आहे.
भारत नेट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गठीत नियंत्रण व देखरेख समितीची आढावा सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नियंत्रण व देखरेख समिती भारतनेट फेज-१ यांच्या अध्यक्षतेत १९ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींपैकी ३५७ ग्रामपंचायतीत नेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
-------------------------
बॉक्स
सालेकसा तालुक्यातील एकही ग्रामपंचायत नाही
भारत नेट अभियानांतर्गत जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींत नेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. यात सालेकसा तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीमध्ये नेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली नाही, तर आमगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायती, गोंदिया १०९, गोरेगाव ५६, अर्जुनी - मोरगाव ५४, देवरी ५४, तिरोडा १४, सडक - अर्जुनी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमध्ये नेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींत लवकरच नेट कनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे.