आंतरधर्मीय प्रेमीयुगुल विवाह बंधनात
By admin | Published: July 6, 2017 02:08 AM2017-07-06T02:08:55+5:302017-07-06T02:08:55+5:30
प्रेमाची व्याप्ती मोठी आहे. समाजात वावरणारा प्रत्येक जन कोणावर तरी प्रेम करतो. प्रेमानेच सारे जग सर करता येवू शकते,
मिलिंद बुद्ध विहार संस्थेचा उपक्रम : समाज परिवर्तनाची नांदी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : प्रेमाची व्याप्ती मोठी आहे. समाजात वावरणारा प्रत्येक जन कोणावर तरी प्रेम करतो. प्रेमानेच सारे जग सर करता येवू शकते, असे म्हणतात. प्रत्येकाच्या प्रेम करण्याच्या पध्दती मात्र वेगवेगळ्या असू शकतात. अंतर्मनातून निस्सीम प्रेम करणाऱ्यांमध्ये कदापिही गरिबी-श्रीमंती, जात, पंथ, धर्म आड येत नाही. ऐन तारुण्याच्या वयात एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्या आंतरधर्मीय प्रेमीयुगुलांना विवाह बंधनात बांधून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकविण्याचे काम येथील मिलिंद बुध्द विहार संस्थेने केले. जाती-पातीला मुठमाती देऊन बौध्द व हिंदू धर्मीय प्रेमवीर अखेर लग्नाच्या जोखडात बांधल्या गेले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागाव (सिरोली) येथील २३ वर्षाचा युवक राकेश भाईचंद मेश्राम हा कामानिमित्त गाव सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन-तीन वर्षापूर्वी गेला होता. एका खासगी कंपनीमध्ये काम करीत असताना देवगड तालुक्यातील सौंदाळे येथील प्राजक्ता मोडे या युवतीशी त्याची पहिल्या प्रथम ओळख झाली. एकाच ठिकाणी कामाला असल्याने दोघांच्याही भेटीगाठी व्हायच्या. वारंवार भेटीच्या प्रसंगांनी घट्ट मैत्रीचे रुप धारण केले. पाहता पाहता ते दोघेही एकमेकांच्या प्रेमपाशात अडकले.
मागील दोन वर्षांच्या सहवासाने त्यांचे प्रेम बहरले. प्रेमात आपला धर्म आड येणार नाही, अशी प्रतिज्ञा करुन भविष्यात पती-पत्नी म्हणून आपला नवा संसार थाटू, असे ते प्रेमीयुगुल स्वप्न रंगवित होते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या युवक-युवतींच्या घरची परिस्थिती बेताची असतानासुध्दा प्रेमात विजय मिळविण्यात ते यशस्वी झाले.
दोघे ही सज्ञान असल्याने पुढील आयुष्य आपण पती-पत्नी म्हणून नांदू, अशी खुणगाठ मनोमन बांधून दोघेही प्रेमीयुगुलांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महागाव-सिरोली येथील प्रेमविराचे घर गाठले. बोंडगावदेवी येथील एका नातलगाच्या मदतीने त्यांनी मिलिंद बुध्द विहार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून लग्न लावून देण्याची विनंती केली. दोघांच्याही जन्म तारखेवरुन विवाहयोग्य वय असल्याची खात्री झाल्याने आनंद बुध्द विहारामध्ये आंतरधर्मीय विवाह समारंभ आयोजित करण्यात आला.
संस्थेचे पदाधिकारी मयाराम रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली भिवाजी शहारे, अशोक रामटेके, पुंडलिक भैसारे, जितेंद्र मेश्राम, सुखदास रामटेके यांच्या उपस्थितीत सोहळा पार पाडण्यात आला. मुलगा बौध्द धर्माचा असल्याने वैवाहिक कार्यक्रम बौध्द धम्माच्या संस्कार पध्दतीने पार पाडून, त्या आंतरधर्मीय प्रेमीयुगुलांना विवाह बंधनात अडकवून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्यात आले. धार्मिक विधी अमरचंद ठवरे यांनी पार पाडली. मिलिंद बुध्द विहार संस्थेच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य भेट स्वरुपात देण्यात आले. लग्न समारंभाला मुलाचे नातलग तसेच गावातील बहुसंख्येने नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
शासन स्तरावरुन आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात असल्याने संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. ही एक समाजपरिवर्तनाची नांदी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्या प्रेमीयुगुलांना आशीर्वाद देऊन अनेकांनी आर्थिक भेट दिली.