आंतरराज्यीय पूर नियंत्रण समिती सज्ज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:18+5:302021-08-01T04:27:18+5:30
गोंदिया : सद्यस्थितीत राज्यात पूरसदृश परिस्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. मान्सून कालावधीत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती ...
गोंदिया : सद्यस्थितीत राज्यात पूरसदृश परिस्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. मान्सून कालावधीत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असल्याचे वक्तव्य विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला भेटी दरम्यान केले.
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे या शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण
कक्षास भेट देऊन पूर परिस्थितीमध्ये सुरक्षा व बचाव करण्यासाठी उपयोगी साहित्यांची पाहणी करून सखोल माहिती घेतली. नियंत्रण कक्ष २४ बाय ७ कार्यरत ठेवून शोध व बचाव पथकामार्फत आपत्ती प्रसंगी गरजूंना तात्काळ मदत देणेबाबत निर्देश दिले. भेटीदरम्यान जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पूर परिस्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा
संभाव्य धोका आहे. वैनगंगा नदीच्या काठावर असलेले गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील संभाव्य पूर असलेल्या १९ गावांमध्ये आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी आंतरराज्यीय पूर नियंत्रण समितीच्या माध्यमातून मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व महाराष्ट्र राज्यातील गोंदिया भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांमध्ये समन्वय ठेवून
महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात येत आहे. पूर नियंत्रणासाठी आंतरराज्य पूर नियंत्रण व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहे. ग्रुपमध्ये दोन्ही राज्यातील महत्त्वाचे अधिकारी यांचा समावेश करून जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना केली जात आहे.
..............
आपत्ती व्यवस्थापन पथकाचे केले कौतुक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना व पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी असणारी बोट, लाईफ जॉकेट, लाईफ बॉय, इमर्जन्सी लाईट, ओबीएम मशीन व घरगुती साहित्यापासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिव्हाईस इत्यादी साहित्यांची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाचे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.