कार्यक्षेत्राबाहेरील गावांना अवैध नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:56 PM2019-05-29T23:56:31+5:302019-05-29T23:58:07+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुजल पाणी वाटप सहकारी संस्थाद्वारे कार्यक्षेत्र नसलेल्या गावात अवैध नळ जोडणी करुन दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करून अवैध नळ जोडणी करुन देणाºयावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुजल पाणी वाटप सहकारी संस्थाद्वारे कार्यक्षेत्र नसलेल्या गावात अवैध नळ जोडणी करुन दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करून अवैध नळ जोडणी करुन देणाºयावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्रादेशिक पाणी पुरवठा विभागातंर्गत खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. सुजल पाणी वाटप सहकारी संस्था सब एजन्सी म्हणून काम पाहते. नवेगावबांध जलाशयातून यासाठी पाणी उपसा केला जातो. त्यामुळे २४ तास पाण्याचा उपसा होत असल्यामुळे जलाशयात फार मोजकाच पाणी साठा उपलब्ध आहे. यासाठी निस्तार हक्क असलेल्या पाच गावात कालव्यातून पाणी सोडता येत नसल्यामुळे या गावातील विहिरी बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे. तर या भागातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नवेगावबांध ग्रामवासीयांचे संतापाचे हे एक कारण आहे. तर दुसरीकडे, भाजीपाला पिकविणे, घराच्या बांधकामासाठी ही संस्था अवैधरित्या नळ जोडणी देत असल्याने गावकºयांच्या संतापात आणखी भर पडली आहे. ही संस्था स्वत:ला जलाशयाचा नवा मालक समजत आहे. नवेगावबांध येथील देवलगाव रस्त्यावर एका व्यक्तीच्या शेतातील आवार भिंतीचे बांधकाम सुरु आहे. सदर संस्थेने त्यांना अवैध नळ जोडणी दिली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर सर्रासपणे बांधकामासाठी केला जात आहे.हा संतापजनक प्रकार नवेगावबांध ग्रामवासीयांच्या लक्षात आला. नवेगावबांध ग्रामपंचायतचे उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांच्यासह काही गावकºयांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. २६ मे रोजी उपसरपंच लांजेवार व इतर पंचाच्या समक्ष या अनाधिकृत प्रकाराचा पंचनामा करण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा सर्रास उपयोग बांधकामाकरिता होत असल्याचे निदर्शनास आले. जलाशयात पुरेसे पाणी नसताना निस्तार हक्काच्या पाण्याचे दुरुपयोग होत आहे.
खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत नवेगावबांध, बोंडे, खोली या गावांचा समावेश होत नाही.तरी सुध्दा पांढरवानी ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया खोलीग्राम या गावात ५२, बोंडे गावात ६० च्यावर, नवेगावबांध येथे टी-पार्इंट परिसरात काही अवैध नळ जोडण्या देण्याचे काम सदर पाणी वाटप संस्थेने केले आहे.
नवेगावबांध ग्रामपंचायतची स्वत:ची नळयोजना आहे हे येथे उल्लेखनिय आहे.
या संस्थेचे मजूरही परस्पर विनापावती अनामत रक्कम घेवून स्वगावी बोंडे, खोलीग्राम येथे अवैध नळ जोडण्या देत असल्याचे बोलल्या जाते. नळ जोडणी देताना अनामत रक्कम काही दिवसानंतर परत करु असे आश्वासन संस्थेच्या वतीने दिले जाते. मात्र अजूनपर्यंत अनामत रक्कम परत करण्यात आली नसल्याचे नळ कनेक्शन धारकांच्या तक्रारी आहेत.
पाटबंधारे
विभागाचेही दुर्लक्ष
आपले कार्यक्षेत्र नसताना मुख्य पाईप लाईनवर अवैधरित्या नळ जोडणी करुन लाखो रुपयाचा गोरखधंदा ही संस्था गेल्या काही वर्षापासून करीत असून पाण्याचा अवैध व्यापार करीत आहे. यावर कुठल्याही शासकीय यंत्रणेचे व पाटबंधारे विभागाचे नियंत्रण नाही. एकीकडे पाण्याचा अवैध व्यापार सुरु असताना नवेगावबांध जलाशयाचे निस्तार हक्क असलेल्या गावाकरिता बारमाही निस्ताराकरीता कालव्याद्वारे पाणी सोडता येईल ऐवढे पाणी राखून ठेवण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. तसे निस्तारपत्रकात नमूद आहे. तरीपण पाटबंधारे विभाग व प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित
निस्तार हक्क असलेल्या नवेगावबांधसह पाच गावात कालव्याद्वारे पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही. अशी सबब पुढे करुन पाणी न सोडल्यामुळे विहिरी, बोअरवेल आटल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविणाºया संस्थेच्या मनमानी कारभारामुळे या पाच गावातील शेतकरी रबी हंगामापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप नवेगावबांध येथील शेतकºयांनी केला आहे.
सखोल चौकशीची मागणी
प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.गावकºयांचे निस्तार हक्काचे संरक्षण करणारी ग्रामपंचात नवेगावबांध याबाबत काय भूमिका घेते, याकडे समस्त गावकºयांचे लक्ष लागले आहे.