हल्ल्याचा सर्वत्र निषेध
By admin | Published: April 10, 2016 01:54 AM2016-04-10T01:54:22+5:302016-04-10T01:54:22+5:30
गोंदियाचे आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.
गोंदिया : गोंदियाचे आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. एका लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर त्यांनी काम तरी कसे करावे, असा सूर राजकीय क्षेत्रात उमटत आहे. दरम्यान, अशा पद्धतीने एका आमदारावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्यामुळे शहरवासीयांसोबत जिल्हाभरात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार गोपालदास अग्रवाल यांची पत्रपरिषद सुरू असताना भाजपचे गोंदिया नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा व त्यांच्या एका सहकाऱ्याने तिथे येऊन त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या नाकाला जबर मार लागला. यातच त्यांचे कपडेही फाटले. त्यांच्या बचावासाठी गेलेले त्यांचे पुत्र विशाल यांचेही कपडे आरोपींनी फाडले. विशेष म्हणजे भर पत्रपरिषदेत हा प्रकार घडल्याने सारेच अवाक झाले.
या प्रकाराने तिथे उपस्थित जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यासुद्धा घाबरून गेल्या होत्या. पण त्या परिस्थितीतही त्यांनी आ.अग्रवाल यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आ.अग्रवाल यांना अॅम्बुलन्सने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोंदियाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेचे वृत्त रात्री ८ वाजेपर्यंत गोंदिया शहरात आणि जिल्ह्यात पसरले. शहरात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद केली. यामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत तणावाची परिस्थिती होती.
घटनास्थळावर रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्वांचे बयाण नोंदवून घटनाक्रमाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते. नगरसेवक शिव शर्मा आणि साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल असे रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
आज गोंदिया बंद
या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी यासाठी काँग्रेस पक्ष व काँग्रेसच्या सर्व सेलकडून रविवारी गोंदिया शहरात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. हा बंद शांततेच्या मार्गाने करावा असे आवाहन प्रफुल्ल अग्रवाल यांनी केले.