आर्थिक व्यवहाराची चौकशी करा

By admin | Published: July 7, 2016 01:55 AM2016-07-07T01:55:42+5:302016-07-07T01:55:42+5:30

तालुक्यातील पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या एलईडी बल्ब व शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या ...

Investigate financial transactions | आर्थिक व्यवहाराची चौकशी करा

आर्थिक व्यवहाराची चौकशी करा

Next

ग्रामपंचायत पिंपळगाव : चौकशी अहवालावरून कारवाई करा
बोंडगावदेवी : तालुक्यातील पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या एलईडी बल्ब व शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तक्रारीवरून सहायक खंडविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालावरून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रफुल खोब्रागडेसह गावकऱ्यांनी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची तक्रार ग्रामस्थांनी केली. गावामध्ये लावण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या एलईडी बल्बमध्ये तसेच गावात बांधलेल्या शौचालय बांधकामामध्ये आर्थिक घोळ असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला होता. तक्रारीच्या अनुषंगाने सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी २७ मे २०१६ रोजी प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयात जावून चौकशी केली. तक्रारकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने चौकशी अहवाल सादर केला. ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशी अहवालात काही प्रमाणात ताशेरे ओढून संशयास्पद व्यवहार केल्याचे आढळून येत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतच्या १३ व्या वित्त आयोग निधी मधून ३० नग एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी पुरवठादारांकडून निविदा मागविण्यात आल्या. ३ हजार ३५० रुपये, १ हजार ४५० रुपयाप्रमाणे प्रतिनग पथदिव्याची किंमत असताना ९ हजार रुपये जास्त किंमतीचे दरपत्रके उपलब्ध झाल्याचे ठरावात नमूद असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. तसेच खरेदी प्रक्रियेतून २२ पथदिवे खरेदी केले आहेत. ८ पथदिवे खरेदी केले नसून भ्रष्टाचार केल्याचा त्यात उल्लेख केला आहे.
शौचालय बांधकाम न करताच जुने शौचालय दाखवून निधीचा गैरवापर केल्याचे आढळून आल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. विलास हेमराज गजबे व त्यांचे वडील हेमराज गजबे या दोघांनाही वेगवेगळ्या वेळी शौचालय निधी प्राप्त होऊनही दोघांनीही शौचालये बांधले नाही, असे स्पष्ट नमूद केल्याचे त्या अहवालात दिसून येत आहे.
पथदिव्याच्या खरेदीसाठी ग्रामसेवकाने कोणत्याही प्रकारची जाहीर नोटीस वर्तमानपत्र दिले नाही. गावामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयातही लावले नाही. कोणताही प्रचारप्रसिध्दी जाहीर न करताच गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या दूरवरच्या ठिकाणावरून दरपत्रके प्राप्त होणे, हे संशयास्पद आहे. संबंधित ग्रामसेवकानेच पुरवठादारांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केला.
पुरवठा आदेश दिलेल्या माही ट्रेडर्सने एकूण किती नग पथदिवे कोणत्या कंपनीचे ग्रामपंचायतला पुरविले याची नोंद साठा रजिस्टरला नाही. प्राप्त दरपत्रके, मूळ बिल व पुरवठा केल्याची पोचपावती ग्रामपंचायत कार्यालयाकडे चौकशी अधिकाऱ्यांनी मागणी केली असता सादर करण्यात आली नाही.
या व्यवहाराची प्रशासकीयदृष्ट्या कोठेही अपेक्षित आवश्यक नोंद घेण्यात आली नाही. पुरवठादाराला अशा केलेल्या रकमेचे प्रमाणके व धनादेश यांच्यात पूर्णपणे विसंगती असून दिशाभूल केली आहे. साठा नोंद रजिस्टरला यापूर्वी पर्यावरण समृध्दी योजनेमधून पाच व समाज कल्याण योजनेतून १० पथदिव्यांची नोंद केलेली नाही, असे चौकशी अहवालात चौकशी अधिकाऱ्यानी म्हटले आहे.
२४ आॅगस्ट २०१५ च्या पुरवठादारांच्या प्रतिनग दराच्या किंमतीमध्ये खाडाखोड केलेली दिसल्याचे नमूद आहे. एकंदरीत एलईडी बल्ब खरेदी व शौचालय अनुदान वाटपात गैरप्रकार होऊन आर्थिक गैरव्यहार झाल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.
त्यामुळे सरपंच, सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Investigate financial transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.