शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:12 PM2018-08-02T22:12:06+5:302018-08-02T22:12:58+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. याच मार्गावरुन रात्रंदिवस दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरच खड्डा पडल्याने कोणत्याही क्षणी अपघात घडून जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही हा रस्ता दुरूस्ती न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शेंडा येथून ४ किमी व राष्ट्रीय महामार्ग-६ वरून तीन किमी अंतरावर असलेल्या प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर भूस्खलन होवून अंदाजे पाच फूट खोल खड्डा पडला आहे.
यामध्ये डांबरीकरणाचा अर्धा भाग खचून खड्यात समाविष्ट झाला आहे. या मार्गावरुन वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कोणत्याही क्षणी वाहत खड्ड्यात पडून जीवित हानी होवू शकते. तरीही या प्रकारामुळे सा.बां. विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
या खड्ड्यात कोणीही पडू नये यासाठी पादचाºयांनी झाडाच्या फांद्या टाकून वाहन चालकांना अलर्ट केले आहे. मात्र एवढ्यावरच अपघात टाळता येत नाही. रात्रीच्या वेळी सुध्दा वाहने ये-जा करतात.
अशावेळी वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनवधानाने वाहन सरळ मार्गाने नेण्याचा प्रयत्न केल्यास वाहन खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही किंवा जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तीन महिन्यांपूर्वीच या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याची गुणवत्ता बघण्यासाठी अभियंता याच मार्गाने ये-जा करीत होते. त्यावेळी त्यांना खड्डा दिसला नाही का? किंवा लालसेपोटी कंत्राटदारांशी संगनमत करुन आपसात सोटेलोटे तर केले नसावे, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सा.बां. विभागाचे आहे. अधूनमधून तरी या विभागाचे कर्मचारी, अधिकारी या मार्गाने ये-या करीत असतील. त्यांना या खड्ड्याची माहिती नसावी का? किंवा एखाद्या अपघाताची वाट तर बघत नाही? असे वाहन चालकांकडून बोलले जाते.
जनतेचे हित लक्षात घेवून त्वरित या खड्ड्याची दुरूस्ती करुन वाहनचालकांना मार्ग सुकर करुन देण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांनी तसेच जनतेने केली आहे.