कामठा-पांजरा रस्ता अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 09:37 PM2018-12-22T21:37:32+5:302018-12-22T21:37:47+5:30
तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नसल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.
कामठा-आमगाव मार्गे भोषा ते पांजरा हा रस्ता खड्डयांमुळे गायब झाल्याचे चित्र आहे. डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या गावकºयांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. भोसा, किकरीपार, कट्टीपार, बनगाव, गणेश घाट या रस्त्यांची सुध्दा तिच स्थिती आहे. वर्षाभरात या ठिकाणी तीन अपघात झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच मार्गावरुन बालाघाट ते डोंगरगड, राजनांदगाव, रायपूर, भिलाई येथील प्रवासी प्रवास करतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेकडो दुचाकी, चारचाकी व जडवाहन या रस्त्यावरुन धावतात. मागील वर्षभरापासून अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी याची दखल घेवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी भोसा येथील सरपंच सुनील ब्राम्हणकर, सहकार चळवळीचे नेते सुखदेव ब्राम्हणकर, कालीमाटीचे सरपंच गजानन भूते, करंजीचे सरपंच डॉ. हंसराज चुटे, काँग्रेसचे नेते गणेश हुकरे, गणेश हर्षे, शंकर रहांगडाले, युवराज पटले, महेंद्र रहांगडाले, बंडू सोनवाने, अशोक खोब्रागडे, लोकचंद तरोणे, हुलसराम बहेकार, शंकर कुरंजेकर, योगेश्वर फरकुंडे, एकनाथ हत्तीमारे, सरिता बहेकार, संगिता फुंडे, मनिषा मटाले, कांता मटाले, वच्छला बागडे, देवानंद डोंगरे, योगेश चुटे, धनिराम मरस्कोल्हे, हेमंत तावाडे, पारबता भांडारकर, पारबता हेमणे, ललीता लांजेवार, केशर फुंडे यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार
कामठा ते आमगाव या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. गावकऱ्यांनी याबाबत ची तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पत्र देऊन मोकळे होण्यातच धन्यता मानली. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम आहे.