केशोरी ते वडेगाव रस्ता अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:53+5:302021-02-27T04:38:53+5:30
या दोन्ही रस्त्यांने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
या दोन्ही रस्त्यांने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देवून तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव (शिरोली) ही दोन्ही रस्ते रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून दैनंदिन कामासाठी दिवसरात्र या दोन्ही रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहनासह हलकी वाहनांची वर्दळ असते. शालेय विद्यार्थी सुध्दा दररोज या रस्त्याने ये-जा करीत असतात. केशोरी ते वडेगाव (बंध्या) हा रस्ता गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. बाजारपेठेच्या दृष्टीने वडसा हे महत्वाचे ठिकाण असल्यामुळे या रस्त्यांने मोठया प्रमाणात नागरिक जात असतात. त्याच बरोबर अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी केशोरी ते महागाव (शिरोली) या रस्त्याशिवाय दुसरा रस्ता नसल्यामुळे तालुक्याच्या दैनंदिन कामासाठी या रस्त्याने जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. ही दोन्ही रस्ते अत्यंत अरुंद असून पूर्णत: खड्डे पडून धोकादायक झाली आहेत. अनेकदा या रस्त्याने लहान-मोठी अपघात झाल्याने नागरिकांनी भिती वाटत आहे. दिवसेंदिवस या रस्त्याने अपघातात वाढ होत आहे. परंतु या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीकडे या भागातील आमदार,खासदारांसह सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कदाचित मोठा अपघात होण्याची वाट पाहात तर नसावेत अशी नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. या महत्वाच्या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष नसल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीकडे सबंधित विभागाने आणि लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष देवून तातडीने या रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीची कामे सुरु करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.