आॅगस्ट महिन्यात सिंचन प्रकल्प अर्धेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 09:27 PM2018-08-19T21:27:09+5:302018-08-19T21:28:17+5:30
मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर शेतकऱ्यांचे बरेच गणित अवलंबून असते. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथील तलावात केवळ ३.१३ टक्के, कोसबी बकी येथे ३.०४ टक्के पाणीसाठा आहे. स्थानीक स्तरच्या तलावांमध्ये सालेगाव ६.०३ टक्के व चारभाटा ६.४८ टक्के पाणीसाठा आहे. गिरोला तलावात १५.९२, चिरचाडी १३.५९, कोसमतोंडी १६.५०, खाडीपार १०.०६, मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा जलाशयात १८.३०, लघू प्रकल्पातील भदभद्या तलावात ३२.४६, रिसाला १०.२३, सालेगाव २१.८६, शेरेपार तलावात २९.७२, नवेगावबांध ३६.६७, तर ओवारा तलावात २५.९९ टक्के पाणीसाठा आहे. बोदलकसा जलाशयात ७७.३२, चुलबंद ५१.२७, खैरबंदा ५७.०९, मानागड ७७.८३, रेंगेपार ५४.५३, संग्रामपूर ९०.५३, कलपाथरी ५७.९५, आक्टीटोला ६८.१३, गुमडोह ६८.६७,कालीमाटी ६८.३०, मोगर्रा ६०.३२, पिपरीया ५७.९०, पांगडी ५६.२१, बडेगाव ८१.६६, जुनेवानी ६२.४४, बेवारटोला ८७.२०, भिवखिडकी ७५.१५, चान्ना-बाक्टी ८०.१५, धाबेटेकडी ६५.६५, गोठणगाव ५३.४४, कवठा ७०.४५, खैरी ८५.१६, खमारी ७९.३०, पळसगाव ५६.२२, पालडोंगरी ८१.६९, पळसगाव (डव्वा) ५९.९१, पुतळी ९८.५९, सौंदड ७५.११, तेढा ६९.११, ताडगाव ५६.५८ व छत्तरटोला तलावात ९३.२९ टक्के पाणीसाठा आहे. या तलावात सध्या तरी समाधानकारक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, ज्या तलावांत पाणीसाठा कमी आहे ते तलाव सिंचनासाठी महत्वपूर्ण आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.
मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक स्थिती
मध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची जिल्ह्यातील संख्या ६९ आहे. यात एकूण ५३.३१ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांची स्थिती उत्तम आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत या तलावांत फक्त १७.७५ टक्के पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पांच्या नऊ जलाशयांत ५८.३१ टक्के पाणी असून मागील वर्षी फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा होता. लघू प्रकल्पातील २० तलावांत ४४.७४ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २१.२८ टक्के पाणीसाठा होता. तर जुन्या मालगुजारी ३८ तलवांत यंदा ५६.५९ पाणीसाठा आहे तर मागील वर्षी फक्त २२.१५ टक्के पाणीसाठा होता.
१० तलावात शंभर टक्के
जिल्ह्यातील काही तलाव व जलाशय अद्याप तहानलेले असतानाच काही तलाव शंभर टक्के भरले आहेत.यात कटंगी, राजोली, सोनेगाव, उमरझरी, भानपूर, फुलचूर, गंगाझरी, मेंढा, मोरगाव व माहुरकुडा या तलावांचा समावेश आहे.