जिल्ह्यात होणार सिंचनक्रांती
By admin | Published: January 23, 2016 12:29 AM2016-01-23T00:29:00+5:302016-01-23T00:29:00+5:30
पूर्व विदर्भातील सर्व मामा तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच दुरुस्ती व पुर्नस्थापनेचा कार्यक्रम सरकारने सुरु केला आहे.
राजकुमार बडोले : ताडगाव मामा तलाव दुरुस्तीचे भूमिपूजन
गोंदिया : पूर्व विदर्भातील सर्व मामा तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच दुरुस्ती व पुर्नस्थापनेचा कार्यक्रम सरकारने सुरु केला आहे. यांतर्गत जिल्ह्यात यावर्षी ३६ मामा तलावांची दुरुस्ती व पुर्नबांधणीचे काम होणार आहेत. तसेच इतर अर्धवट सिंचन प्रकल्पांच्या कामाला गती येणार असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या दिवसांत सिंचन क्रांती होणार असल्याचे प्रतिपादन, जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील मामा तलावाच्या दुरुस्ती व पुर्नस्थापना कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार दयाराम कापगते, जिल्हा परिषद सदस्य मंदा कुंभरे, पंचायत समिती सदस्य पंधरे, रघुनाथ लांजेवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष अमृत नाकाडे, सरपंच रेखा मडावी, गौरीशंकर अवचटे, प्रभाकर काळबांधे, विनोद नाकाडे, नूतन सोनवाने, संदीप कापगते, देवेंद्र टेंभरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बडोले यांनी, आपल्या जिल्ह्याला जुन्या काळापासून तलावांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या पूर्वजांनी व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मालगुजारी तलावांची बांधणी केल्यामुळे इतर जिल्ह्यापेक्षा सिंचनाच्या बाबतीत आपली चांगली स्थिती आहे. यामुळेच तलावांचा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील बऱ्याच काळापासून तलावांची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना व पर्यायाने पिक, गुरांना पाण्याचा प्रश्न पडतो. सरकार या बाबतीत गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवारामुळे राज्यात जलक्रांती होत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मामा तलावांच्या दुरुस्तीचे कार्य हाती घेतले असल्याचे सांगीतले.
तसेच जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सरकार जाणून आहे. मागील वर्षी २५० व या वर्षी २०० रुपये प्रती क्विंटल प्रोत्साहन अनुदान मदत म्हणून सरकारने दिले आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करुन आपली स्थिती कशी सुधारणार याकडे लक्ष घालणे गरजेचे असल्याचे ते बोलले. ताडगाववासीयांना विधानसभा निवडणुकाआधी दिलेले वचन पूर्ण करीत असून या माध्यमाने आपल्याशी भेट व्हावी हा या भूमिपूजनामागचा उद्देश होता, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी पाणी वापर संस्था व ग्रामपंचायत ताडगावच्यावतीने नामदार बडोले यांचा सत्कार करण्यात आला. सदर दुरुस्ती कार्याचा खर्च ६५ लक्ष असून यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मोठा लाभ मिळणार असल्याची माहिती ढोरे यांनी दिली. संचालन सोनदास गणवीर यांनी करुन आभार मानले. (शहर प्रतिनिधी)