नुसतीच फॅशन की जिवाला धोका? गोंदियात ५१७ जणांकडे बंदूक परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 03:40 PM2024-10-11T15:40:37+5:302024-10-11T15:44:32+5:30
शस्त्र बाळगण्याची गरज नसलेल्यांकडेही परवाने : पडताळणी करण्याची आहे गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्याच्या डिजिटल युगात स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय, गोंदियात ५१७ जणांकडे बंदूक परवाने आहेत. राजकीय नेते, व्यापारी यांसह गावगुंडही कमरेला शस्त्र बाळगण्याची फॅशन करीत आहेत.
शस्त्र परवाना काढण्यासाठीचे नियम अत्यंत कठोर आहेत. परंतु मधला मार्ग काढून अनेक जण शस्त्र परवाने काढण्यात यशस्वी होतात, तर काही जणांना गरज असतानाही अनेक वर्षे शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे ज्यांना शस्त्र बाळगण्याची गरज नाही, अशा शस्त्रधारी मंडळींची पडताळणी होण्याची गरज आहे.
शस्त्र परवाना कोणाला दिला जातो ?
खरे तर बंदूक परवाना हा काही विशिष्ठ कारणांसाठी दिला जातो. एखाद्याला दुसऱ्यापासून धोका आहे, असे वाटत असेल तर स्वसंरक्षणासाठी तो परवान्याची मागणी करू शकतो. त्याचबरोबर ही प्रामुख्याने दोन कारणे शेतीचे प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी शस्त्र परवाना दिला जातो. हि प्रामुख्याने दोन कारणे शस्त्रांचा परवाना देण्यामागे असतात. मात्र, अनेक जण या दोन्ही कारणांचा वापर केवळ फॅशन म्हणून करतात. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे समजण्यासाठी अनेक जण कमरेला पिस्तूल लावून समाजात फिरत असतात. यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल, अशी त्यांची समजूत असते. पाच वर्षांत वाढले अर्ज वर्षांत शस्त्र परवाना काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांनी स्वसंर क्षणासाठी शस्त्र परवाना काढण्यावर भर दिला आहे. यातील अनेकांना शस्त्र परवाने मिळाले आहेत.
शस्त्र परवाना काढायचा कसा?
कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, मेडिकल प्रमाणपत्र, पोलिस पाटील, तलाठी दाखला, पोलिसांकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. खात्री झाल्यानंतरच परवाना मिळतो.
नियम कडक करण्याची आवश्यकता
परवाना मिळण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट असली तरी आणखी नियम कडक करणे गरजेचे आहे. खरी गरज असेल त्यालाच परवाना मिळणे गरजेचे आहे. मात्र, अनेक जण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, यावर जरब हवी.
तर होणार कारवाई शस्त्र सांभाळणे कठीण
- शस्त्राचा चुकीचा वापर झाला तर तो गुन्हा आहे. यासाठी शस्त्र वापरताना नियम पाळावे लागतात. आचारसंहिता काळात शस्त्रे जमा करावी लागतात. जर काही अघटित झाले तर कारवाई होते.
- अनेकदा घरामध्ये कौटुंबिक वाद होतात. अशा वेळी रागाच्या भरात परवाना मिळालेल्या शस्त्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्र सांभाळणे कठीणच आहे.
- जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांना आपले शस्त्र नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावे लागते.