‘त्या’ मोबाईलमध्ये दडलयं काय? ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 10:27 PM2022-10-28T22:27:26+5:302022-10-28T22:28:09+5:30
२४ वर्षाची तरुणी एसबीआय बँकेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देत तिला कारंजा येथील एव्हरग्रीन हॉटेलात नेले. त्या हॉटेलात तिची अश्लील चित्रफीत तयार केली. अनेक निर्वस्त्र फोटोही घेतले. ते फोटाे व अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील तीन महिन्यांपासून अत्याचार करीत होता. तिने त्याच्या अत्याचाराचा विरोध केल्यास तिला शिवीगाळ करून ॲसिड टाकण्याची धमकी देत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बँकेत जात असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून तिला एका हॉटेलात नेत तिची अश्लील चित्रफीत बनविली. तसेच मागील तीन महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या गोंदियाच्या इंदिरानगरातील २३ वर्षांच्या तरुणावर गोंदिया शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. नितेश देवीदास बोरकर (२३, रा. इंदिरानगर, पिंडकेपारटोली) असे आरोपीचे नाव आहे. त्या आरोपीला २६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये काय दडले आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणारी एक २४ वर्षाची तरुणी एसबीआय बँकेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देत तिला कारंजा येथील एव्हरग्रीन हॉटेलात नेले. त्या हॉटेलात तिची अश्लील चित्रफीत तयार केली. अनेक निर्वस्त्र फोटोही घेतले. ते फोटाे व अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील तीन महिन्यांपासून अत्याचार करीत होता. तिने त्याच्या अत्याचाराचा विरोध केल्यास तिला शिवीगाळ करून ॲसिड टाकण्याची धमकी देत होता. या घटनेसंदर्भात पीडित तरुणीने २६ ऑक्टोबर रोजी गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (एन), ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांनी त्वरित अटक केली. न्यायालयाने या आरोपीला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीसकोठडी सुनावली आहे. त्याच्या मोबाईलची संपूर्ण तपासणी करण्यासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मोबाईलमध्ये काय दडले आहे, त्याच्या मोबाईलमधून अजून काय रहस्य उलगडते, याकडे लक्ष लागले आहे.
एकच चर्चा एव्हरग्रीन हॉटेलची
प्रियकराचे व अश्लील चाळे करणाऱ्यांचे आश्रयस्थान बनलेल्या आयटीआयजवळील एव्हरग्रीन हॉटेल आता प्रत्येकाच्या तोंडातून ऐकिवात येत आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या असो, बलात्कारच्या घटना, अश्लील चित्रफीत याच हॉटेलात तयार झाल्याने या हॉटेलची चर्चा शहरात जोरदार आहे.