जिल्ह्यात माता, बालकांचे आरोग्य ठणठणीत आहे का?
By नरेश रहिले | Published: February 3, 2024 07:45 PM2024-02-03T19:45:19+5:302024-02-03T19:45:32+5:30
जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूची समस्या, माता आणि बालकांचे आरोग्य सांभाळण्यामध्ये गोंदिया जिल्हा सध्या १८ व्या क्रमांकावर आहे.
गोंदिया : गोंदिया हा आदिवासीबहुल जिल्हा असून जंगल व शहरी भागामध्ये विभागला आहे. नक्षलग्रस्त भागात राहणारा आदिवासी समाज आता काही प्रमाणात विकास व आधुनिकीकरणाच्या जवळ पोहोचत आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यास कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्युसारख्या समस्या भेडसावत आहेत. या सर्व समस्यांच्या मुळाशी किशोरवयातील व गर्भवती स्त्रियांचे पोषण, तसेच गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत बाळाच्या पोषणातील समस्या हे कारण आहे. माता आणि बालकांचे आरोग्य सांभाळण्यामध्ये गोंदिया जिल्हा सध्या १८ व्या क्रमांकावर आहे.
नोव्हेंबर रॅंकिंगमध्ये जिल्हा कोठे?
१) नोव्हेंबर महिन्यात दिलेल्या रँकिंगमध्ये गोंदिया जिल्हा आरसीएच पोर्टलवर राज्यात १८ व्या क्रमांकावर आहे.
२) दीड वर्षापूर्वी गोंदिया पहिल्या क्रमांकावर होता आता तोच जिल्हा १८ व्या क्रमांकावर आहे.
आयुष्मान भारत : १० लाख ७४ हजार ५९० उद्दिष्टापैकी ३ लाख ५१ हजार ४४७ नागरिकांनी कार्ड काढले आहेत.
नियोजन शस्त्रक्रिया :- ९ हजार २०० चे उद्दिष्ट असताना त्यापैकी २ हजार ८५६ उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे.
आरसीएच पोर्टल : गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात १८ व्या क्रमांकावर आहे.
क्षयरोग दुरीकरण : जिल्ह्यातील ९८ ग्राम पंचायती क्षयरोगमुक्त होणार आहेत.
हिवताप निर्मूलन : हिवतापाच्या बचावासाठी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागात व जंगलव्याप्त भागात डासनाशक फवारणी करून मच्छरदाण्या वाटप केल्या जातात.
तंबाखू नियंत्रण : तंबाखू नियंत्रणात गोंदिया जिल्ह्याची प्रगती उत्तम आहे. तंबाखू खाणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कोटपा अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
मानसिक आजार : तणावग्रस्त असलेल्या लोकांच्या समुपदेशनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रेरणा केंद्र असून तणावग्रस्त लोकांना उत्तमरीत्या मार्गदर्शन केले जाते