बोदलबोडी शाळेचा ईशान्त आज आकाशवाणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:46+5:302021-03-20T04:27:46+5:30
सालेकसा : शाळेबाहेरची शाळा उपक्रमांतर्गत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर शनिवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजता सालेकसा तालुक्यातील दुर्गम भागात असलेली ...
सालेकसा : शाळेबाहेरची शाळा उपक्रमांतर्गत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर शनिवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजता सालेकसा तालुक्यातील दुर्गम भागात असलेली जि.प. प्राथमिक शाळा बोदलबोडी येथील इयत्ता तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी ईशान्त राजेंद्र खोटेले आपले अभ्यासाविषयी अनुभव सादर करणार आहे.
विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्यातून तीन दिवस शाळेबाहेरील शाळा उपक्रमाचे आकाशवाणीवरून प्रसारण केले जाते. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. मागील एका वर्षापासून प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनात आपला अभ्यास कसा पुढे नेला, याबद्दल आपले अनुभव विद्यार्थी मांडत असतात. गोंदिया जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा तसेच उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली बोदलबोडी येथील जि.प.ची शाळा अप्रत्यक्षपणे वर्षभर सुरू होती. येथील मुख्याध्यापक मनोहर कटरे यांच्या मार्गदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सतत सुरू ठेवला. शाळेबाहेरील शाळा या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ऑनलाइन शिक्षणासह गृहभेटी, फोनवरून वार्तालाप करून अभ्यास गावातील शिक्षित युवकांद्वारे मोहल्ल्यात घेण्यात येणारे शैक्षणिक वर्ग विविध पोस्टर चार्ट आणि आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यासक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला. याचअंतर्गत ईशान्त खोटेले या विद्यार्थ्याची आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे मुलाखत घेण्यात आली, ती शनिवारी प्रसारित होणार आहे.