गोंदियात गांजापुरवठा करणाऱ्या उडिसाच्या इसमाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:03+5:302021-07-20T04:21:03+5:30
गोंदिया : रावणवाडी पोलिसांनी १४ जुलै रोजी कामठा येथील घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) याच्याकडून आठ लाख ४३ ...
गोंदिया : रावणवाडी पोलिसांनी १४ जुलै रोजी कामठा येथील घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) याच्याकडून आठ लाख ४३ हजार रुपये किमतीच्या ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून अटक करण्यात आली होती. चौकशीत त्याने गांजा पुरविणाऱ्या उडिसा येथील आरोपीचे नाव सांगितले. त्याआधारे पोलिसांनी उडिसा येथून संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
रावणवाडी पोलिसांनी जप्त केलेल्या ७० किलो गांजाप्रकरणी घनश्याम अग्रवालविरोधात मादक पदार्थविरोधी अधिनियम कलम ८,२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला विचारपूस केली असता त्याने गांजा उडिसा राज्यातील अंगूल जिल्ह्यातील किशोरेनगर तालुक्यातील कडाली येथील अरखित बिम्बांधर बेहेरा (४०) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. यावर रावणवाडी पोलिसांनी उडिसा येथे जाऊन त्याला शनिवारी (दि.१७) ताब्यात घेतले. अरखित बेहेरा याने गांजा पुरवित असल्याची कबुली दिली आहे. आरोपीला मंगळवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गठित केलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कोरे, पोलीस नायक चव्हाण, पोलीस नायक भुरे, पोलीस शिपाई बिसेन यांनी केली आहे.