डम्पिंग यार्ड जागेचा विषय प्राधान्याने सोडविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:39+5:30
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत गरजेचे झाले. यातूनच नगर परिषदेने आतापर्यंत टेमनी, रतनारा, फुलचूर आदि गावांत प्रकल्पासाठी जागेची मागणीही केली होती. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. असे असतानाच आता नगर परिषदेला ग्राम सोनपुरी येथे जागा नजरेत आली असून त्यासाठी तयारी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागेला घेऊन शोध मोहीम सुरू आहे. अशात कित्येक गावांनी जागेसाठी नकार दिल्याने नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप तयार झाला नाही. अशात आता ग्राम सोनपुरी येथील जागा नगर परिषदेच्या नजरेत असून ती जागा मिळाल्यास व प्रकल्प उभा झाल्यास अवघ्या शहरातील कचऱ्याची समस्या सुटणार यात शंका नाही.
जिल्ह्यातील नगर पंचायतींकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र नगर परिषदेकडे अद्याप प्रकल्प नसल्याने सर्वांनाच आश्चर्य होते. शिवाय शहरात दिवसाला निघणाऱ्या सुमारे ५२ टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होत आहे. नगर परिषद सध्या मोक्षधाम परिसरात कचरा टाकत आहे.
मात्र हा प्रकार धोकादायक आहे. परिणामी नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत गरजेचे झाले. यातूनच नगर परिषदेने आतापर्यंत टेमनी, रतनारा, फुलचूर आदि गावांत प्रकल्पासाठी जागेची मागणीही केली होती.
मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. असे असतानाच आता नगर परिषदेला ग्राम सोनपुरी येथे जागा नजरेत आली असून त्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यातील सभेत यावर निर्णय झाला नाही. त्यानंतर ३ महिने कोरोनामुळे सभा घेता आली नाही व तो विषय आणखी रेंगाळला.
जून महिन्यातील सभेत विषय घेण्यात आला असता त्यावर निर्णय लागला नाही. परिणामी आता या महिन्यातील सभेत तरी या विषयाचा सोक्षमोक्ष लागावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
टास्क फोर्स ने दिले होते नोटीस
नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्याबाबत जिल्हा टास्क फोर्सने नगर परिषदेला जानेवारी महिन्यात नोटीस दिला होता. यात नगर परिषदेला १ महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे हे काम रखडत चालले असल्याने हरकत नाही. मात्र आता सोनपुरीच्या जागेचा विषय गांभीर्याने घेत हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. असे झाल्यास हे वर्ष नगर परिषदेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहण्यात येणार यात शंका नाही.
शहराचा होणार कायापालट
नगर परिषदेला सोनपुरीची जागा मिळाल्यास व तेथे प्रकल्प उभा झाल्यास गोंदिया शहराचा कायापालट होणार. शहरातील कचºयाची समस्या सुटणार असतानाच संबंधित गावातील तरूणांना रोजगार मिळणार. शिवाय कचऱ्यापासून खत निर्मिती झाल्यास त्याचा लाभही गावकरी घेऊन शकतील. एवढेच नव्हे तर त्या गावातील कचऱ्याची समस्या सोडविता येणार. प्रकल्पामुळे गोंदिया शहराला फायदा होणार असतानाच सोबतच त्या गावाची कचऱ्याची समस्याही सुटणार यात शंका नाही.