रेल्वे स्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफार्म तिकीट ५० तर पार्किंग ३० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:00 AM2021-08-25T05:00:00+5:302021-08-25T05:00:07+5:30
दुचाकी वाहने ठेवण्यासाठी २४ तासांचे ३० रुपये चारचाकी वाहनांसाठी ६० रुपये शुल्क आकारले जात आहेत. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र हे दर कमी करण्यासंदर्भात अद्याप कुठल्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याने तेच दर कायम ठेवण्यात आले आहे.
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वेस्थानकावरील होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यात प्लॅटफार्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले. आता संसर्ग आटोक्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र अद्यापही प्लॅटफार्म तिकिटाचे दर कमी केले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नातेवाईक किंवा मित्राला सोडायला जाणाऱ्यांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरूनच परतावे लागत आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक असून या रेल्वे स्थानकावरून दररोज २५ हजारावर प्रवासी ये-जा करतात. लाॅकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावरून दररोज ४०० ते ५०० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री होत होती. आता ती दीडशे ते दोनशेच्या आसपास आहे. तिकिटांचे दर कमी न केल्याने प्रवाशांमध्ये रोष व्याप्त आहे.
प्लॅटफार्म तिकीटातून रेल्वेची कमाई
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफार्म तिकीटात फेब्रुवारी महिन्यापासून वाढ केली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दरराेज दीडशे प्लॅटफार्म तिकीटाची विक्री होत असून यातून रेल्वे स्थानकाला मागील सहा महिन्यात जवळपास सात ते आठ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. प्लॅटफार्म तिकीट विक्रीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
पार्किंगही महाग
रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग वाहन करण्यासाठीच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. दुचाकी वाहने ठेवण्यासाठी २४ तासांचे ३० रुपये चारचाकी वाहनांसाठी ६० रुपये शुल्क आकारले जात आहेत. पार्किंगचे कंत्राट देण्यात आले असून पार्किंगच्या शुल्कात दरवर्षी वाढ केली जात असल्याने याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र हे दर कमी करण्यासंदर्भात अद्याप कुठल्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याने तेच दर कायम ठेवण्यात आले आहे.
- जनसंपर्क अधिकारी
गावी जाऊन सोडणे परवडले
रेल्वे विभागाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये केले असून एवढे पैसे भरून चंद्रपूर रेल्वे गाडीने प्रवास करता येतो. प्लॅटफार्म तिकीट काढण्यापेक्षा नातेवाइकाला जाऊन सोडणे परवडेल.
- विनय शहारे, प्रवासी
कोरोना संसर्गाच्या नावावर रेल्वे प्लॅटफार्म तिकिटाचे दर वाढविले होते. पण आता सर्व सुरळीत झाले असतानासुद्धा हे दर कमी केले नाही. त्यामुळे आम्हाला भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- संतोष वाढई, प्रवासी