पावसाळ््यातही होतेय अंगाची लाही-लाही
By admin | Published: June 16, 2017 01:04 AM2017-06-16T01:04:46+5:302017-06-16T01:04:46+5:30
मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे.
पावसाने मारली दडी : उकाड्याने नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैरान झाले असून अंगाची लाह-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
७ जून पासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्यानेही यंदा पावसाळा सुरूवातीपासूनच खुश करणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचा अंदाज चूक ठरत असल्याचेही दिसून येत आहे. सुरूवातीचे दोन-तीन दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता व सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने सर्वच खूश होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. परिणामी वातावरण पुन्हा तापू लागले आहे.
विशेष म्हणजे उन्हापासून पाण्याची वाफ होत असून या उमसमुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. उन्ह पुन्हा उन्हाळ््यासारखे तापू लागले असून घरा बाहेर पडण्यासाठी विचार करावा लागत आहे. त्यामुळे आता पाऊस लवकर बरसावा यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जून महिना आता अर्धा सरला असून फक्त दोन-तीन दिवसच पाऊस पडल्याने हा महिनाही असाच तर निघत नाही ना असा प्रश्न ही पडत आहे. दररोज ढग दाटून येत आहेत, मात्र न बरसताच निघून जातात. आता तरी बरस अशी हाक सर्वच देत आहेत.
९६८.९ मिमी.
बरसला पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत ९६८.९ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस आमगाव तालुक्यात १९५ मिमी. झाला असून सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त ३६.६ मिमी बरसल्याची माहिती आहे. याशिवाय गोंदिया तालुक्यात १०२.१ मिमी., गोरेगाव तालुक्यात १४९.८ मिमी.., तिरोडा तालुक्यात ११५.६ मिमी., देवरी तालुक्यात १२०.४ मिमी.., सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३ मिमी तर सालेकसा तालुक्यात १५७.१ मिमी. असा एकूण ९६८.९ मिमी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २९.२ एवढी आहे.
पारा ३८ डिग्रीच्या घरात
पावसाळा सुरू झाला असूनही जिल्ह्याचा पारा आजही ३८ डिग्रीच्या घरात आहे. यावरून उकाड्याचा अंदाज लावता येतो. आता पाऊस पडल्यावरच यावर काही तोडगा निघणार व पारा खाली उतरल्यावरच उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.