कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काळजी घेणेही तेवढेच गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:38+5:302021-08-27T04:31:38+5:30
कपिल केकत गोंदिया : कित्येकांना चेहऱ्यावर चष्मा लावणे आवडत नसून, याचे प्रमाण तरुण-तरुणींमध्ये जास्त आहे. अशांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स हा ...
कपिल केकत
गोंदिया : कित्येकांना चेहऱ्यावर चष्मा लावणे आवडत नसून, याचे प्रमाण तरुण-तरुणींमध्ये जास्त आहे. अशांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स हा चष्म्याला पर्याय असून सध्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे एक फॅडच तरुण वर्गात दिसून येत आहे. या कॉन्टॅक्ट लेन्समुळे चेहऱ्यावरील चष्म्यापासून सुटका तर होतेच, शिवाय लेन्स वापरण्याचे अन्य फायदेही आहेत. मात्र असे असतानाच कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यासाठी काही नियम असून त्यांचे पालन करणेही गरजेचे आहे. अन्यथा फायदा देणारी कॉन्टॅक्ट लेन्स आपल्याला इजाही पोहोचवू शकते. यासाठी सर्वप्रथम स्वच्छता हा मंत्र गरजेचा असून डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसारच कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याची गरज असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. नीलेश जैन यांनी सांगितले.
------------------------------
चष्म्याला करा बाय बाय...
कॉन्टॅक्ट लेन्समुळे नागरिकांची चष्म्यापासून सुटका होते. मात्र यासाठी काही नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कारण लहान मुलांना लेन्सचे नियम पाळणे तेवढे शक्य होत नाही. अशात त्यांची खबरदारी पालकांना घ्यावी लागते. याशिवाय, लेन्स वापरताना सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे स्वच्छता आहे. लेन्स वापरणाऱ्या प्रत्येकाला लेन्स हाताळताना स्वत:ची व लेन्सचीही स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. कविता भगत यांनी सांगितले.
--------------------
ही काळजी घेणे आवश्यक...
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लेन्स वापरताना हात स्वच्छ धुवावेत. एवढेच नव्हे, तर लेन्सचीही नियमित स्वच्छता करावी. लेन्स लावून कधीही झोपू नये. कचरा गेल्यास डोळे चोळू नयेत.
- लेन्स लावून धुळीच्या ठिकाणी जरा जपूनच वावरावे. लेन्ससाठी असलेले साहित्य नेहमी जवळ ठेवावे व लेन्सची डबी आठवड्यातून एकदा धुऊन घ्यावी. लेन्ससाठीचे द्रव्य डॉक्टरांनी सांगितलेलेच वापरावे.
-------------------------
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
कॉन्टॅक्ट लेन्स हा चष्म्याला नक्कीच पर्याय ठरत असून त्यापासून काही फायदेही आहेत. मात्र लेन्स हाताळण्यासाठी काही नियमही आहेत. अशात लेन्स वापरणाऱ्यांनी या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच लेन्सचे फायदे मिळतात, अन्यथा आपल्याला इजाही होऊ शकते.
- डॉ. नीलेश जैन (नेत्रतज्ज्ञ)
---------------
चेहऱ्यावर चष्मा पसंत नसलेल्यांना कॉन्टॅक्ट लेन्स हा चांगला पर्याय आहे. मात्र लेन्स वापरताना तेवढीच खबरदारी घेण्याचीही गरज आहे. यासाठी स्वत:ची व लेन्सची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळेच लेन्स वापरणाऱ्यांनी स्वच्छतेवर भर द्यावा. तेव्हाच लेन्स काही इजा न होता फायद्याची ठरते.
- डॉ. कविता भगत (नेत्रतज्ज्ञ)
...........