म्युकरमायकोसिस रुग्णांची नियमित माहिती देणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:08+5:302021-05-27T04:31:08+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सद्य:स्थितीत म्युकरमायकोसिसचे २६ रुग्ण असून, या आजारावरील उपचार सुरू असणाऱ्या हॉस्पिटल्सनी रुग्णांची माहिती रोजच्या रोज जिल्हा ...
गोंदिया : जिल्ह्यात सद्य:स्थितीत म्युकरमायकोसिसचे २६ रुग्ण असून, या आजारावरील उपचार सुरू असणाऱ्या हॉस्पिटल्सनी रुग्णांची माहिती रोजच्या रोज जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. या माहितीचा रिअल टाइम डेटा फिड करणे आवश्यक आहे. सरकारने म्युकरमायकोसिस या आजाराला आता नोटिफाइड आजारांच्या यादीत टाकल्याने याची नोंद करणे अत्यावश्यक आहे. या आजारावरील उपचारांमध्ये वापरण्यात येणारे ॲम्फोथेरिसिन-बी हे औषध शासनाकडून उपलब्ध होते. या औषधाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता व्हावी यासाठी आढळून येणाऱ्या रुग्णांची माहिती त्वरित राज्य शासनाच्या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी या माहितीचा अहवाल प्रशासनाला दररोज, वेळेत व न चुकता सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले.
म्युकरमायकोसिसवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सची बैठक जिल्हाधिकारी मीना यांनी आभासी पद्धतीने नुकतीच घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. राजेश खवले, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन, डॉ. राणा, डॉ. संजय भगत,
नोडल ऑफिसर डॉ. गौरव अग्रवाल, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चोरागडे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या नोडल ऑफिसर डॉ. जयंती पटले व सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण हॉस्पिटल्सचे अधीक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी म्युकरमायकोसिस जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.
या आजारात वापरण्यात येणारे ॲम्फोथेरीसिन-बी हे औषध शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होत असून, या आजारावर उपचार सुरू असणाऱ्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्येच भरती असलेल्या रुग्णाला या औषधीचा उपचार देण्यात येत आहे. या आजारावर रुग्णांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत उपचार मिळावेत यासाठी शक्य असणाऱ्या अन्य ईएनटी- आय हॉस्पिटलमध्येही ही योजना सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी दिले.
सर्व डेडिकेटेड कोविड सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स यांना म्युकरमायकोसिस सुरुवातीच्या काळातच प्रतिबंधित कसा करावा याबाबत वेबिनारव्दारे ट्रेनिंग द्यावे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे म्युकरमायकोसिससंबंधी ऑपरेशन करावे लागल्यास त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयात ऑपरेशन थिएटर निश्चित करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मीना यांनी दिल्या.