नीतिमत्ता आधारित विद्यार्थी तयार करणे हे संस्थेचे कार्य असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:16 PM2019-02-04T22:16:48+5:302019-02-04T22:17:04+5:30
शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धडे देतांना उद्याची पिढी संस्कारक्षम कशी निर्माण होईल या गोष्टीचा विचार देखील शिक्षक आणि संस्थेनी करावा. सुंसंस्कृत आणि आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी शाळा व महाविद्यालयातील संस्कार फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे नितिमत्ता आधारीत विद्यार्थी तयार करणे हे संस्थेचे कार्य असावे व ते कार्य भवभूति शिक्षण संस्था कार्य करीत आहे, असे गौरवउद्गार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत संघचालक रामभाऊ हरकरे यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धडे देतांना उद्याची पिढी संस्कारक्षम कशी निर्माण होईल या गोष्टीचा विचार देखील शिक्षक आणि संस्थेनी करावा. सुंसंस्कृत आणि आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी शाळा व महाविद्यालयातील संस्कार फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे नितिमत्ता आधारीत विद्यार्थी तयार करणे हे संस्थेचे कार्य असावे व ते कार्य भवभूति शिक्षण संस्था कार्य करीत आहे, असे गौरवउद्गार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत संघचालक रामभाऊ हरकरे यांनी काढले.
भवभूति शिक्षण संस्था, आमगावच्या वतीने भवभूती महाविद्यालयात श्रध्देय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती कार्यक्रम सोमवारी (दि.४) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. जयंती समारोहाचे उद्घाटन राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.पी.काणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रकाश मालगावे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, माजी आ.डॉ. खुशाल बोपचे, भेरसिंग नागपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफभाई, भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आ. केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबु असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, ढे.र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मीला कावळे, लक्ष्मीबाई नागपुरे, जयंती समारोह संयोजक डॉ. श्रीराम भुस्कुटे तसेच घटक संस्थेचे सर्व प्राचार्य डॉ.डी.के.संघी, डी.एम.राऊत, डॉ. पदमा राऊत, एस.टी.बिसेन, उमादेवी रहांगडाले, संदीप हनुवते, जयंत बंसोड, नंदलाल कथलेवार उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित भवभूती महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. आदर्श विद्यालयात श्रध्देय मानकर गुरुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच मानकर ग्रुप आॅफ इन्स्टीट्युटला भेट दिली व रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.कुलगुरु काणे म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी माणसाची इच्छाशक्ती, साधन सामुग्री, साधन वापरण्याची कला,स्थान हे आवश्यक असते. पण सर्वात महत्वाचे म्हणजे दैव आवश्यक असते म्हणून दैवाची आराधना करणे आवश्यक आहे. मालगावे यांनी गुरुजींनी केलेले कार्य अद्वितीय असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यानी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे ज्यामुळे यश प्राप्त करणे सुकर होते. माणस घडविणारी संस्काराची ज्योत संस्थेने पेटती राहू द्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी सर्व घटक संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्याचे सहकार्य केले.
विविध मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी गुरुजींच्या राजकीय व सामाजिक कार्यात सहकार्य करणारे सत्कारमूर्ती रघुबीरसिंह सूर्यवंशी आमगाव, गेंदलाल कटारे गोंदिया, महेंद्र मेश्राम आमगाव, जगदिशप्रसाद अग्रवाल गोंदिया, इंद्रराज बहेकार चोपा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नॅक कमेटी सदस्य म्हणून नियुक्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे, आचार्य पदवी मिळाल्याबद्दल डॉ. चंद्रकुमार पटले, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागाबद्दल सोेहेल डोये, विद्यापीठ बांबु उडी स्पर्धेत पदक मिळविल्याबद्दल भौतिक नांदगावे आणि अहिंसा दौड स्पर्धेत यशाबद्दल रामकला शेंडे आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमगाव क्षेत्रातील विविध शाखेमधून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याना संघी टॉपर्स अवार्डने सन्मानित करण्यात आले.
५१ रक्तदात्यांचे रक्तदान
जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलीटेक्नीक येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव माजी आ. केशवराव मानकर यांनी मांडले. तसेच सुवर्ण जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी मांडले. संचालन प्रा.पठ्ठे, प्रा. उमेश मेंढे यांनी केले तर आभार अनिल जोशी यांनी मानले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.