गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणाची पाळ फुटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:56 PM2018-03-20T12:56:37+5:302018-03-20T12:56:48+5:30
इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील झाडे अनेक वर्षापासून काढण्यात आली नसल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त असल्याचे दिसत आहे.
संतोष बुकावन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील झाडे अनेक वर्षापासून काढण्यात आली नसल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त असल्याचे दिसत आहे.
इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारीला नाशिकच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे पितळ उघडे पडले. जिल्ह्यातील इटियाडोह हे मोठे धरण आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. मात्र शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. असे निर्देश धरण सुरक्षा विभागाने संबंधित विभागाला दिले होते. याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे या पाळीवर उभी आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे हटवार यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते.
यावर धरण सुरक्षा विभाग क्र. २ कार्यकारी अभियंत्यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या पत्रात त्यांनी वाढलेल्या झाडांमुळे धरणाचे होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन केले नाही. मात्र पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. धरणाची समक्ष पाहणी करुन झाडे काढलेली आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षी निरीक्षण होत असताना ही बाब निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही? ती अनेक वर्षांपासून पाळीवरच वाढलेली आहेत. यावरुन निरीक्षण करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने कालव्यातील झाडांची कटाई होत नसल्याचे सांगितले जाते. तर इटियाडोह प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परघरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर उद्या बोलू असे म्हटले.