यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:00 AM2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:13+5:30
विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : आजची पिढी ही मोबाईल पिढी म्हणून ओळखली जात आहे. त्यामुळे परस्परातील संवाद साधणे दूर होत चालले आहे. आत्मीयतेला खिंड पडत असून विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले.
येथील नवोदय हायस्कूल तथा नवोदय कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा माजी आमदार दादासाहेब शेंडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर तर पाहुणे म्हणून जि.प.सदस्य अर्चना राऊत, उपसरपंच हीरालाल पाटील शेंडे, सहकार्यवाह रामदास पडोळे, विश्वस्त अशोक हलमारे, चरण चेटुले, डॉ. अशोक गहाणे, बी.एस.मोहतुरे, शामदेव रेहपाडे, से.नि.प्राध्यापक रवि सिंगनजुडे, प्रकाश बोरकर, मनोहरपंत ढोमणे, विद्यार्थी प्रमुख मुनेश्वर लुटे, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रियंका भुसारी उपस्थित होते.
माँ सरस्वती, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रांच्या पूजनानंतर दीप प्रज्वलीत करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विज्ञान, हस्तकला व ग्रंथ प्रदर्शनीचे निरीक्षण केले. याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोख व भेटवस्तू देवून पालकांसह त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. आरेकर यांनी, काळ झपाट्याने बदलत चालला आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यानी आपली गतीशिलता वाढवून आपली प्रगती साधावी. कल्पकता, विचारशक्ती जीवंत ठेवून जीवनातील शर्यती जिंकाव्या. शाळा ही चांगल्या मानव निर्मितीचे उत्तम केंद्र असून प्रज्ञावान विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार शेंडे यांनी, विद्यार्थ्यांच्या कला व सुप्तगुणांना वाव तसेच त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य नरेंद्र काडगाये यांनी मांडले. संचालन मनोहर पाऊलझगडे यांनी केले. आभार संयोजक प्रा. हिवराज साखरे यांनी मानले.