खड्डे बुजविण्याच्या कामात दडणार पाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:07 AM2017-11-26T01:07:46+5:302017-11-26T01:08:04+5:30
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोंदिया जिल्हा दौरा केल्यानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोंदिया जिल्हा दौरा केल्यानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. त्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. मात्र याच रस्ता बांधकामात अल्पावधीतच पडलेले खड्ड्यांचे पाप दडपले जाण्याची शक्यता आहे.
ना. पाटील यांनी मागील रविवारी (दि.१९) गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. ते गडचिरोली येथून वडसा-अर्जुनी मोरगाव मार्गे गोंदियाला पोहोचले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमिवर प्रमुख राज्य महामार्ग क्रं.११ ची डागडूजी करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख महामार्गावरील खड्ड्यांवरुन सरकारची चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. म्हणून या दौºयाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. महिनाभरात हे खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. बरडटोली ते सुकडी फाटा दरम्यानचा रस्ता यावर्षी एकेरी तयार करण्यात आला होता. त्यावरही खड्डे पडलेले होते. अर्जुनी-मोरगाव-सानगडी मार्गावरील सरांडी रिठी ते सिलेझरी दरम्यानचा रस्ता यावर्षीच तयार करण्यात आला होता.
या दोन्ही मार्गावर अल्पावधीतच खड्डे पडलेले होते. रस्त्याची देखभाल व दुरुस्ती ही कंत्राटदाराकडेच असते. मात्र आता ना. पाटील यांच्या निर्देशानंतर ही डागडूजी संबंधित कंत्राटदाराकडून केली जाते की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते हा सध्या चर्चेचा विषय आहे. विभाग व कंत्राटदाराने रस्ता बांधकामाचे वेळी केलेली पाप यानिमित्ताने दडपले जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन आदळून मोठे नुकसान होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात छोटे- मोठे अपघात सुद्धा घडले आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षीतपणाच कारणीभूत आहे. प्रमुख राज्य महामार्ग ११ वर बरडटोली ते सुकडी फाटा दरम्यान आधीच रस्ता बांधकाम मंजूर होते. त्याचे अर्धवट काम होऊन सोडून देण्यात आले.
दरम्यान रविवारी (दि.१९) ना. चंद्रकांत पाटील ज्या रस्त्याने येणार होते. यासाठी त्यांच्या वाहनाने हेलकावे घेऊ नये व मंत्री महोदयांना खड्ड्यांचे हादरे बसू नयेत. याकरिता स्थानिक सा. बां. उपविभागातर्फे याची विशेष काळजी घेऊन रस्त्यावर डांबरमिश्रीत गिट्टी टाकून खड्डे बुजविण्यात आले. मंत्री गेले अन याच रस्त्याच्या दुसºया बाजूचे बांधकाम सुरु झाले. जर रस्त्याचे नव्याने बांधकामाच सुरु होणार होते. तर मंत्री महोदयाच्या आगमनापूर्वी खड्डे बुजविण्याचे नेमके औचित्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून जनता जनार्धनाच्या या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करुन मंत्र्यासाठी विशेष सुविधा पुरविणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे.
त्या कंत्राटदारांना होणार लाभ
जिल्ह्यातील काही रस्त्यांचे सात आठ महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. अल्पावधीत या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्ता बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य कितपत दर्जेदार असतील हे दिसून येते. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी राज्यातील सर्व मार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा सात आठ महिन्यांपूर्वी रस्त्यांची कामे केलेल्या कंत्राटदारांना लाभ होणार असून त्यांनी केलेले निकृष्ट बांधकाम यात खपणार असल्याची या विभागातच आहे.
कामाची गती मंदावली
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या आगमनापूर्वी रस्त्यांच्या डागडुजी कामे युध्द स्तरावर सुरू करण्यात आली. मात्र ते जाताच आता पुन्हा या कामांची गती मंदावली असून लक्षात येणाºया मुख्य मार्गावरच खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत.