शिवाजी महाराजांच्या कार्याचे अनुकरण करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:05+5:302021-02-26T04:42:05+5:30
देवरी : आजच्यासारख्या सुविधा त्या काळी नसतानासुद्धा अनेक समस्यांना तोंड देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाच्या, देशाच्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी ...
देवरी : आजच्यासारख्या सुविधा त्या काळी नसतानासुद्धा अनेक समस्यांना तोंड देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाच्या, देशाच्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्यभर बालपणापासूनच राष्ट्रभक्तीचे धडे घेऊन शत्रूशी लढून राष्ट्रकार्य केले. हेच कार्य सर्वांनी आपआपल्या दैनंदिन जीवनात अनुकरण करून आपले जीवन सुखी व आनंदी करावे, असे प्रतिपादन संस्थाचालक झामसिंग येरणे यांनी केले.
स्थानिक छत्रपती शिवाजी संकुलात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जिल्हा संघटक वीरेंद्र अंजनकर, सचिव यादव पंचमवार, माजी जि. प. सदस्या सविता पुराम, राजेश चांदेवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू, तालुकाध्यक्ष अनिलकुमार येरणे, तालुका महामंत्री प्रवीण दहीकर, विनोद भांडारकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंद्रजितसिंग भाटीया, मार्गदर्शक बंट्टी भाटीया, ललन तिवारी, इमरान खान, माजीद खान, देवानंद मेश्राम, कृष्णा येरणे, डाॅ. सुनील येरणे आणि संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरीतर्फे विविध क्षेत्रातील तीन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील दिव्या फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, साखरीटोला येथील प्रोग्रेसिव्ह युवा संघटनेचे कार्यकर्ते आणि देवरी येथील विविध क्षेत्रात सेवाकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चन्ने यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज भुरे मांडले. संचालन सुरेश मेश्राम यांनी केले. आभार प्राचार्य सुनीलकुमार येडे यांनी मानले.