कळते पण वळत नाही
By admin | Published: January 14, 2015 11:09 PM2015-01-14T23:09:53+5:302015-01-14T23:09:53+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी न घेता विद्यार्थ्यांची आॅटो आणि इतर वाहनांमधून सर्रास दिवसाढवळ्या नियमबाह्यपणे वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या वाहनांमधून
धोकादायक वाहतूक सुरूच : रस्ता सुरक्षा सप्ताहातही कोणतीच कारवाई नाही
गोंदिया : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी न घेता विद्यार्थ्यांची आॅटो आणि इतर वाहनांमधून सर्रास दिवसाढवळ्या नियमबाह्यपणे वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या वाहनांमधून नेणे कायद्याने गुन्हा असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी म्हणतात, मात्र त्या वाहनांवर ना परिवहन विभाग कारवाई करीत, ना वाहतूक नियंत्रण विभाग. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हजारो रुपये खर्च करणारे पालकही या बाबतीत बिनधास्त कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमतने बुधवारी ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमीने उपप्रादेशिक परिवहन विभाग खळबडूून जागा झाला. परवानगी न घेता आॅटोमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आॅटो चालकांवर कारवाई केल्याचे त्यांनी आज (दि.१४) सांगितले. मात्र किती वाहनांवर अशी कारवाई झाली याची आकडेवारी ते देऊ शकले नाही.
परवानगी न घेता आॅटोमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असेल तर हे चुकीचे आहे. असुरक्षितरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोक्याचे आहे. पालक वर्ग हजारो रूपये खर्च करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी गोंदियातील चांगल्या शाळांमध्ये पाठवितात. एका विद्यार्थ्यावर वर्षाकाठी ४० हजार रूपये खर्च करणारे पालक आपल्या पाल्यांचा जीव धोक्यात टाकून खुल्या आॅटोतून त्यांची वाहतूक करण्यास तयार असतात.
अनेक शाळातील विद्यार्थ्यांना खासगी आॅटोतून ने-आण केली जाते असल्याचे चित्र आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू असताना उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण शाखेने या आॅटोंना अभयदान दिले आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. जेव्हा- जेव्हा हे आॅटो त्यांच्यासमोर आले तर क्वचितच कारवाई केली जाते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन किती तत्पर आहे यावर नजर टाकल्यास संबधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)