आयटीआयचा पेपर पाऊण तास उशिराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 09:56 PM2017-08-06T21:56:32+5:302017-08-06T21:57:55+5:30
येथील आौद्योगीक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) गुरूवारपासून (दि.३) द्वितीय सत्र परिक्षेला सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा: येथील आौद्योगीक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) गुरूवारपासून (दि.३) द्वितीय सत्र परिक्षेला सुरूवात झाली. परंतु सुतार व्यवसाय शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्गातील पर्यवेक्षकाने नियमित वेळेच्या पाऊण तास उशिरा प्रश्नपत्रिका सोडविण्यास दिली. त्यामुळे पुढे पाऊन तास अतिरिक्त वेळ द्यायला हवा होता. मात्र पर्यवेक्षकाने नियमित वेळेतच उत्तरपत्रिका परत घेतली. यावर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे धाव घेतली असता तेथेही न्याय मिळाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांनी पुढील पेपरांवर बहिष्कार टाकला.
परिक्षेची नियोजित वेळ दुपारी २.३० ते ५.३० आहे. मात्र सुतार व्यवसाय शाखेच्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकांंनी पाऊण तास उशिरा म्हणजेच ३.१५ वाजता प्रश्नपत्रिका दिली. प्रश्नपत्रिकापाऊस तास उशिरा मिळाल्यावर पेपर सोडविण्यासाठी पुढे पाऊन तास अतिरिक्त वेळ मिळणार या बेताने १५ विद्यार्थी आपला पेपर सोडवित होते. मात्र पर्यवेक्षकाने वेळ संपताच लगेच उत्तरपत्रिका गोळा करण्यास सुरूवात केली व १० मिनीटांत उत्तरपत्रिका गोळा करून घेतल्या.
यावर विद्यार्थ्यांनी पाऊन तास उशिराने पेपर सुरू झाला असता अतिरीक्त वेळ मागीतला. मात्र पर्यवेक्षकाने विद्यार्थ्यांची एक न ऐकता उत्तरपत्रिका घेतली. पर्यवेक्षकांनी ऐकले नाही म्हणून विद्यार्थ्यांनी प्राचार्याच्या कक्षात धाव घेतली व त्यांना घडलेला प्रकार सांगीतला. परंतु प्राचार्यांकडेही विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी सर्व विद्यार्थ्यानी पुढील पेपर देणार नाही असा निर्णय घेत परिक्षेवर बहिष्कार टाकला. तसेच या प्रकाराची तक्रार आमदार क्षेत्राचे संजय पुराम यांच्याकडे केली.
विद्यार्थ्यांकडून परिक्षेत घडलेल्या प्रकाराबाबत ऐकताच आमदार पुराम यांनी आयटीआयला भेट देत घडलेल्या प्रकरणाची चौकशी केली. मात्र आयटीआय प्रशासनाने असा प्रकार घडल्याचे नाकारले. यामुळे मात्र शुक्रवारी (दि.४) आयटीआयचे वातावरण तापलेले होते. विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गणिताचा आणि शनिवारी (दि.५) ड्रॉईंगचा पेपर देण्यावर बहिष्कार टाकत परिक्षेत उपस्थित झालेच नाही.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी प्रकाराबद्दल वरिष्ठाकडे तक्रार करण्याची भाषा केली असता प्राचार्य एस.के.बोरकर यांनी पोलीस बोलावून तुमच्यावर कारवाई करण्याची धमकी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगीतले. परिक्षेत मनमानी करणाºया पर्यवेक्षक व प्राचार्यावर कारवाई व्हावी व सुटलेले पेपर पुन्हा देण्याची संधी मिळाली अशी मागणी विद्यार्थ्यांनी आमदार पुराम यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार
सालेकसा येथील आयटीआय मधील सर्व निदेशक दररोज ट्रेनने अपडाऊन करतात. त्यांन ट्रेनने परत जाण्याचा वेध लागला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे योग्य लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. ट्रेनने परत जाण्याच्या बेतानेच पर्यवेक्षकाने वेळेआधीच उत्तरपत्रिका परत घेतल्याचे आमदार पुराम यांनी सांगीतले. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून पिडीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठांशी संपर्क करून कारवाई करणार असे आमदार पुराम यांनी सांगीतले.