इटियाडोह धरणाचा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:01 IST2018-08-02T22:00:39+5:302018-08-02T22:01:30+5:30
इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले.

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले. वृत्त लिहिपर्यंत कालवा फुटलेल्या ठिकाणी संबंधित विभागाद्वारे उपाययोजना करण्यात आली नव्हती.
शेतकºयांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी इटियाडोह धरणाची निर्मिती १९४७ मध्ये करण्यात आली. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. धरण तर तयार झाले मात्र धरण कालव्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने वारंवार कालवा फुटण्याच्या घटना घडत आहे. धरण निर्मितीला ५१ वर्षे लोटली. मात्र अद्यापही कालव्याला अस्तरीकरण करण्यात आले नाही. अनेक ठिकाणी धरणातील पाण्याच्या झिरपणामुळे पाणी साचते. कालव्यामध्ये मोठी झाडे उगवली. मात्र ते कापण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे अधिकारी सांगतात. कालव्यात वाढलेल्या या झाडांच्या मुळामुळे शेजारील जागा भुसभुसीत होते व त्यामुळे ती वाहून कालव्यात जाते. यामुळे कालवा तर बुजतो. परंतु कालवा फुटण्याचीही भिती असते. या गंभीर बाबीकडे इटियाडोह धरण प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. फुटलेल्या ठिकाणी डागडुजीसाठी पाच मजूर कामावर होते. कालव्यावरील पाळीवर असलेला मुरुम या डागडुजीसाठी वापरण्यात आल्याची माहिती आहे.