इटियाडोह विकासाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:21 PM2017-12-26T23:21:17+5:302017-12-26T23:21:32+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे. हे पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक व आकर्षित करणारे स्थळ आहे. परंतु या स्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक सोईसुविधांपासून हे स्थळ वंचित आहे.
अनेकदा वर्तमानपत्रामधून येथील सोयीसुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात या परिसरातील तरुण उत्साही मंडळी एकत्र येवून त्यांनी इटियाडोह परिसर विकास मंच स्थापन केला. तसेच दर रविवारी लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचा संकल्प करुन ठराव पारित करण्यात आला.
या परिसराकडे शासनाचे पर्यायाने इटियाडोह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. नळ योजना बंद पडली आहे. विद्युत सुविधा नाही, विद्युत पोल आहेत, परंतु दिवे बंद आहेत. विश्रामगृहामधील फ्रीज बंद आहे. पर्यटकांसाठी हॉटेल व जेवणाची व्यवस्था नाही. वाहन पार्किंगची व्यवस्था नाही. येथील बगिचा सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या महत्वाच्या असुविधांमुळे पर्यटकांची गैरसोय व निराशा होत आहे.
ही बाब लक्षात घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात इटियाडोह जलाशय परिसर विकास मंच तयार करण्यात आला. लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करुन रविवार (दि.२४) पाणी विसर्ग मुख्य गेट ते ओवर फ्लोपर्यंतच्या पाळीवरील वाढलेल्या झाडझुडपांची कापणी करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने राजे ग्रुप अर्जुनी-मोरगावसह योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार, सचिन फटींग, गुणवंत पेशने, सुनील बांते, आशीष डोंगरवार, प्रशांत डोंगरवार, मिथुन टेंभरे, हितेश हलमारे, लिलाधर निर्वाण, कांतीलाल डोंगरवार, सतीश शहारे, चंदू बोरकर, हर्ष हलमारे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
या वेळी परिसरातील १०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. यानंतर शासनाची कोणतीही मदत न घेता स्वतंत्र निधी उभारुन अत्यंत आवश्यक असणारी कामे हाती घेवून पूर्ण करण्याचा संकल्प घेण्यात आल्याचे लोकमतला सांगण्यात आले.