‘तो कसा जगतो’ हे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:28 PM2018-02-04T21:28:18+5:302018-02-04T21:28:34+5:30
भवभूती शिक्षण संस्थेच्यावतीने लक्ष्मणराव मानकर गुरुजी शैक्षणिक परिसर फार्मसी कॉलेजमध्ये लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी गृह व नगर विकास मंत्री रणजीत पाटील यांनी, कोण किती जगतो यापेक्षा तो कसा जगतो, हे खूप महत्वाचे असते,....
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भवभूती शिक्षण संस्थेच्यावतीने लक्ष्मणराव मानकर गुरुजी शैक्षणिक परिसर फार्मसी कॉलेजमध्ये लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी गृह व नगर विकास मंत्री रणजीत पाटील यांनी, कोण किती जगतो यापेक्षा तो कसा जगतो, हे खूप महत्वाचे असते, असे उद्घाटकीय भाषणात म्हटले.
अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले होते. उद्घाटन गृह व नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील होते. मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अप्पाजी स्वामी (वेल्लूर, तामिळनाडू), खा. अशोक नेते, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आ. केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक स.रं. अंजनकर, ढे.र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मिला कावळे, लक्ष्मी नागपुरे, समारंभ संयोजक डॉ.डी.के. संघी तसेच घटक संस्थेचे सर्व प्राचार्य, डॉ. श्रीराम भुस्कुटे, डी.एम. राऊत, एस.टी. बिसेन, उमादेवी रहांगडाले, ए.ए. सड्डल, संदीप हनुवते व जयंत बन्सोड उपस्थित होते.
आपल्या पदस्पर्शाने परिसर पावन करुन पूज्य डॉ. अप्पाजी स्वामी यांनी सर्वांना दर्शन व आशीर्वाद दिले. या आनंदाच्या क्षणी सर्व घटक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांनी मनोरंजन व उद्बोधनपर नृत्य सादर करुन आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी गुरुजींच्या राजकीय व सामाजिक कार्यात सहकार्य करणारे दादासाहेब टिचकुले (केसलवाडा), प्रमोद संगीडवार (देवरी), गणेश हेमणे (गोंदिया), मोहन लिल्हारे (शंभुटोला), दादु बोपचे (बोरकन्हार), प्रभाकर गद्रे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श विद्यालयातील संतोष पुरी, भवभूती महाविद्यालयातील बुद्धघोष शिंगाडे, शुद्धोधन गायकवाड यांचा आचार्य पदवी मिळविल्याबद्दल आणि प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
तसेच आमगाव क्षेत्रातील विविध शाखांमधून प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना संघी टॉपर्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. जयंती महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेतर्फे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ.डी.के. संघी, डॉ. श्रीराम भुस्कुटे, रवी आचार्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानकर ग्रुप आॅफ इन्स्टीट्युतर्फे डॉ. डी.के. संघी यांना सन्मानपत्र देण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, आजच्या युगातील शैक्षणिक संस्थांंनी समाजाच्या गरजपूर्तीसाठी कार्य करावे. गुरुजींनी शाळा सुरु करुन पवित्र कार्य केले. गुरुजींचे हे कार्य भविष्याला दिशा देणारे आहे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून ना. राजकुमार बडोले म्हणाले, गुरुजींनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही समाजसेवेत कार्य करीत राहू, असे सांगितले. सर्व पाहुण्यांनी गुरुजींच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करण्याचे आवाहन जनतेला केले. याप्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले. सोबत डॉ.डी.के. संघी यांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव माजी आ. केशवराव मानकर यांनी मांडले. संचालन उमेश मेंढे व जोशी यांनी केले. आभार डॉ. डी.के. संघी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व घटक संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.