घर गहाण ठेवण्याची वेळ आली! हे कसले लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:11+5:302021-04-11T04:28:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जवळपास चार महिने उद्योगधंदे बंद ...

It's time to mortgage the house! What a lockdown | घर गहाण ठेवण्याची वेळ आली! हे कसले लॉकडाऊन

घर गहाण ठेवण्याची वेळ आली! हे कसले लॉकडाऊन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जवळपास चार महिने उद्योगधंदे बंद होते. यामुळे अनेकांचे बजेट बिघडले, अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले, तर काहींवर उधार-उसनवारी करुन वेळ मारुन नेण्याची वेळ आली. अनेकांनी काटकसर करुन कसेबसे सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मागील दोन-तीन महिन्यांपासून सर्वच उद्योगांची गाडी रुळावर येत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे छोट्या उद्योजकांची सर्वाधिक कोंडी झाली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च, व्यापारी आणि बँकांची देणी कुठून फेडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमधून सावरण्यासाठी दागिने विकले आता घर गहाण ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. लॉकडाऊनच्या नावावर छोट्या उद्योजकांना एकप्रकारे वेठीस धरले जात आहे. त्यामुळे गोरगरिबांनी आणि छोट्या व्यावसायिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर करताना लघु व्यावसायिकांचा विचार करण्याची गरज आहे.

............

मागील वर्षी सात महिनेच सुरु राहिले दुकान

जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत दुकाने बंदच होती. त्यामुळे दुकानाचे भाडे, विजेचे बिल, कामगारांचा पगार हे सर्व घरुनच द्यावे लागले. त्यातच व्यापाऱ्यांचे देणे असल्याने त्यासाठी उधार- उसनवारी करावी लागली. यावर्षीही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योगधंदे पुन्हा चौपट झाले आहेत.

........

जिल्ह्यात २१० दिवसच सुरु राहिले दुकाने.

..................

सततच्या लॉकडाऊमुळे तणाव वाढतोय

आमची चहाची छोटीशी टपरी आहे. त्यावरच आमच्या कुटुंबाचा गाडा चालतो. मात्र, आता शासनाने पुन्हा लॉकडाऊन केल्याने मागील पाच-सहा दिवसांपासून दुकान बंद आहे. आणखी किती दिवस बंद राहील, याचा काही नेम नाही. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगावे तरी कसे, हे आम्हाला शासनानेच सांगावे.

- छाया मडावी, गृहिेणी

........

आमचे छोटेसे हॉॅटेल असून, आमच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. याच व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे कर्ज काढून जगण्याची वेळ आली होती. त्याचेच हप्ते अजून फिटलेले नाहीत. त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने घर गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

- मिनाक्षी उमक, गृहिणी

..........

शासनाने लॉकडाऊन जाहीर करताना किमान आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांचा विचार करायला हवा. लाॅकडाऊन करायचे आहे मग आम्हाला अनुदान तरी द्यावे, प्रत्येकवेळी कुणाकडे हात पसरायचे. आता कुठे उद्योगधंद्याची गाडी रुळावर आली होती. त्यातच आता पुन्हा दुकाने बंद झाल्याने आम्ही जगायचे कसे?

- मीराबाई जाधव, गृहिणी.

Web Title: It's time to mortgage the house! What a lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.