जबलपूर-चांदाफोर्ट धावणार आता आठवड्यातून तीन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:26 AM2021-03-07T04:26:40+5:302021-03-07T04:26:40+5:30
गोंदिया : गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाचे ब्राॅडगेजमध्ये रुपातंर झाल्यानंतर या मार्गावरुन आता रेल्वे विभागाकडून रेल्वे गाड्या सुरु केल्या जात आहे. ...
गोंदिया : गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाचे ब्राॅडगेजमध्ये रुपातंर झाल्यानंतर या मार्गावरुन आता रेल्वे विभागाकडून रेल्वे गाड्या सुरु केल्या जात आहे. रिवा-इतवारी सुपरफास्ट रेल्वे गाडीनंतर आता जबलपूर-चांदाफोर्ट दरम्यान नवीन रेल्वे गाडी ८ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवून जबलपूर ते चांदाफोर्ट या रेल्वे गाडीचा शुभारंभ करणार आहेत. ही गाडी क्रमांक ०२२७४ जबलपूरहून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल त्यानंतर नैनपूर रेल्वे स्थानकावर ५.५५, बालाघाट रात्री ८.५५, गोंदिया ९.५५ आणि चांदाफोर्ट स्थानकावर रात्री १ वाजता पोहचेल. ९ मार्च रोजी चांदाफोर्ट-जबलपूर गाडी क्रमांक ०२२७४ चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरुन दुपारी २.३० वाजता सुटेल त्यानंतर ही गाडी गोंदिया रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.१५ वाजता पोहचेल, बालाघाट ७.१०, नैनपूर ८.३० आणि जबलपूरला रात्री ११.२५ वाजता पोहचेल. याच वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस धावणार आहे. यामुळे जबलपूर चांदाफोर्ट मार्गावरील प्रवाशांना सोयीचे होणार आहे. जबलपूर-चांदाफोर्ट (०२२७४) सुपरफास्ट स्पेशल गाडी जबलपूरवरुन ११ मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजता सुटेल. नैनपूर ८.१० वाजता, बालाघाट ९.३५ वाजता, गोंदिया १०.१५ वाजता, चांदाफोर्ट१.४५ वाजता पोहचेल ही गाडी आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शुक्रवारी धावणार आहे.
.............
सौंदड,वडसा मूल स्थानकावर थांबा द्या
रेल्वे विभागाने चांदाफोर्ट-जबलपूर ही गाडी आता आठवड्यातून तीन दिवस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा ८ मार्चपासून शुभारंभ होत आहे. मात्र गोंदिया ते चांदाफोर्ट या २५० किमीच्या अंतरावर या गाडीला कुठेच थांबा नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना या गाडीचा फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने या मार्गावरील महत्वपूर्ण स्थानक समजल्या जाणाऱ्या सौंदड,वडसा, मूल या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा देण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक लंजे यांनी केली आहे.
............
तर गोरगरीब प्रवाशांना होईल मदत
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून गोंदिया-चांदाफोर्ट ही पॅसेजर गाडी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सुध्दा बसत आहे. त्यामुळे जबलपूर-चांदाफोर्ट या रेल्वे गाडीला या मार्गावरील काही प्रमुख रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास गोरगरीब प्रवाशांना सुध्दा मदत होईल.
..........