जागृत देवस्थान कोकणाई माता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:28 PM2018-10-15T21:28:44+5:302018-10-15T21:30:10+5:30
परिसरातील बोळदे-कवठा वनपरिक्षेत्रात कोकणाई मातेचे भव्य देवस्थान आहे. दरवर्षी नवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते.अनेक ठिकाणाहून भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. यंदा मंदिराच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे.
मुन्नाभाई नंदागवळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : परिसरातील बोळदे-कवठा वनपरिक्षेत्रात कोकणाई मातेचे भव्य देवस्थान आहे. दरवर्षी नवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते.अनेक ठिकाणाहून भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. यंदा मंदिराच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. जागृत कोकणाई मातेचे देवस्थान उंचवट्यावर जंगलात आहे. ही जागृत मंदिर म्हणून प्रसिध्द आहे.
जंगल परिसरात हे मंदिर आहे. मातेची मूर्ती ही खडकाच्या आतील भागात डोंगरावर आहे. मूर्तीच्या मागून पाण्याचा झरा दगडातून सतत वाहत असतो. कोकणाई मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. या मंदिराला बराच इतिहास देखील आहे.
डोंगराळ भागात १०९ वर्षापूर्वी एक बालिका नेहमी पूजा करीत असायची, हीच मुलगी पहाडावर घोड्यावरुन स्वारी करीत होती. तिच्या मूर्तीचे पूर्णाकृती पुतळे देखील पहाडीवर सापडले. तसेच या पहाडीवरील जुने अवशेष आजही जसेच्या तसेच ठेवण्यात आले आहेत.
त्यानंतर एका चित्रकाराच्या मदतीने १९९४ मध्ये कोकणाई मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यंदा या देवस्थानच्या कार्यक्रमाला २५ वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे.
कोकणाई मातेच्या मंदिरात जाण्यासाठी कवठा गावापासून रस्ता तयार करण्यात आला. तसेच भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे एका बोअरवेल, दोन सभामंडप सुध्दा भक्तांसाठी तयार करण्यात आले आहे.
दर मंगळवारी व शनिवारी येथे पूजा होत असते. भजनांचा कार्यक्रम सुरु होतो. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवात या मंदिरात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात या मंदिराला मान्यता आहे. कोकणाई मातेच्या देवस्थानाच्या विकासासाठी अध्यक्ष छोटूलाल मारगाये,सचिव केशव किरसान, उपाध्यक्ष भिवा किरसान, ग्रा.पं.सदस्य धम्मदीप मेश्राम, ज्ञानू प्रधान आणि सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.
मंदिराला क तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा मी अनेक वर्षापासून कोकणाई मातेच्या देवस्थानाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. आता रस्ता तयार करण्यासाठी वनविभागाकडे मी पाठपुरावा केला. त्यानंतर रस्ता तयार करण्यात आला. आता या मंदिराला लवकरच क तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल.
- किशोर तरोणे, जि.प.सदस्य.