प्राण्यांचे सुख शोधून नाते जोडणारा जगदीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:30+5:302021-06-06T04:22:30+5:30
मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : तंत्रज्ञानाच्या युगात खूप प्रगती आणि उंची गाठण्यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. पण विज्ञानवादी, जगण्याचा सम्यक सन्मार्ग, ...
मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : तंत्रज्ञानाच्या युगात खूप प्रगती आणि उंची गाठण्यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. पण विज्ञानवादी, जगण्याचा सम्यक सन्मार्ग, प्राणिमात्रांचे जीवन शोधणारे महापुरुष व मोठी माणसे होऊन गेली आहेत. अशाच प्रकारची एक प्रेरणा देणारे अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे जगदीश मेश्राम. मांजर, कुत्री, जनावरे व रानातील माकडे यांच्या जीवाची काळजी करून त्यांचे सुख शोधून आपले प्राण्यांशी नाते जोडले आहे. ही एक अनोखी नात्यांची कथा आहे.
परिसरातील येरंडी-देवलगाव येथील रहिवासी जगदीश बकाराम मेश्राम (वय ५१) हलाखीच्या परिस्थितीत एकटाच स्वतःचे जीवन प्रामाणिकपणे जगतो आहे. या गावात अनेक व्यक्तिमत्त्वांची वेगळीच ओळख असून परिचित आहे.
काही वर्षांपूर्वी कुटुंबातील माणसे सोडून गेली. जगदीश हा बी.एस्सी.पर्यंत शिकला असून इंग्रजीचे वाक्य फाडफाड बोलतो. पूर्वीपासून हुशार होता पण परिस्थितीने हतबल केले. या सर्व दुःखावर मात करून आनंदाने प्राण्यांच्या सहवासात जगदीश आजही जीवन जगत आहे.
जगदीशच्या मनावर अनेक महामानव व महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे. म्हणूनच, अहिंसावादी बुद्धांचा प्राणिमात्रावर दया करा, असा विचार घेऊन हा अवलिया प्राण्यांच्या सहवासात रमतो आहे. जगदीश राहतो तिथे सोबत मांजर व कुत्री राहतात. जणू हाच त्याचा परिवार आहे. पोट भरण्यासाठी अनेक कामे पाहणे तर कधी मागून खाणे, भाजीपाला बाजारात मागणे, अशारीतीने जगदीश जीवनगाणे गात जगत आहे.
.......
घासातील घास प्राण्यांसाठी
भाजीपाला जर जास्त असला, तर तो जनावरांना खाऊ घालतो. फळे वगैरे मिळाली तर तो सोबत राहणाऱ्या सदस्यांसोबत खातो. कुठे कार्यक्रमात जेवायला गेला, तर स्वतः तिथे खातो आणि मांजर व कुत्र्यांसाठी घरी घेऊन जातो. गावालगत आमराई आहे. आमराईत जंगलातील माकडांचा समूह राहतो, त्या बारा-पंधरा माकडांना दररोज जगदीश सकाळ, दुपार व सायंकाळी या वेळेत पिण्यासाठी पाणी घेऊन जातो. हे काम तो नियमित करताना दिसतो. अशा नात्याला व प्रेमाला काय म्हणावे... ही जगदीशची किमयाच न्यारी... हे अनोखेच नातेसंबंध प्राण्यांशी जपतो तो फक्त जगदीश मेश्राम.
........
जगदीशच्या आदर्शाला सलाम
जगदीशच्या कार्याचे कौतुक तर केलेच पाहिजे. त्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे. जगदीश माकडांसाठी पाणी घेऊन जाताना ही वास्तववादी मुलाखत घेण्यास मिळाली. "प्राण्यांचे सुख हे जगदीशचे सुख" असे नातेसंबंध जोडून सुख देणाऱ्या कार्याला व आदर्शाला सलामच आहे.
.......
कोट
मी बुद्धांपासून सर्व शिकलो. रोजच पाणी पाजतो. जेवणही देतो. या गोष्टीत मला सुख-समाधान मिळते. हेच माझे काम आहे.
- जगदीश मेश्राम,
येरंडी-देवलगाव