जनचेतना युवा मंचची जनसमस्यांवर जागृती
By admin | Published: July 1, 2014 01:33 AM2014-07-01T01:33:07+5:302014-07-01T01:33:07+5:30
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी व त्यांना सोबत घेऊन राज्य सरकारला त्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनचेतना
आजपासून पदयात्रा : गुप्ता करणार नेतृत्व
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी व त्यांना सोबत घेऊन राज्य सरकारला त्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनचेतना युवा मंचच्या वतीने १ ते १२ जुलैदरम्यान जनचेतना पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३३० किलोमीटरची पदयात्रा १२ दिवसात १३४ गावांमध्ये जाणार असल्याची माहिती मंचचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या गप्पू गुप्ता यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात विविध स्तरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही. त्यात शेतकरी, विडी कामगार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शासकीय जागेतील बांधकामाचे पट्टे, इंदिरा आवास व राजीव गांधी आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी बीपीएलच्या अटी रद्द कराव्यात, सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव भत्ता आदी २८ मागण्या त्यांनी आपल्या मागणीपत्रात नमुद केल्या आहेत. यावर नागरिकांमध्ये जनजागृती करून नंतर नागरिकांना घेऊन दि.१२ ला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले. गोंदियातील रस्त्यांचे काम दर्जाहीन होत आहे. या रस्त्यांची नागपूरच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्याशिवाय कंत्राटादाराचे बील देऊ नये, तसेच दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी न.प.च्या सभागृहात केली, मात्र सभागृहाने या मागणीचा विचार केला नाही, असेही गुप्ता म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)