जय श्रीराम व जय झुलेलालचा गजर
By admin | Published: April 10, 2016 02:06 AM2016-04-10T02:06:20+5:302016-04-10T02:06:20+5:30
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर
शहरात निघाली भव्य शोभायात्रा : शहरवासीयांनी केले जंगी स्वागत
गोंदिया : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर तर सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेतील ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती. येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची तर सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती.
मराठी नववर्षाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून चैत्र नवरात्रोत्सवाला ही प्रारंभ झाला. हे नवरात्र रामाचे नवरात्रही असल्याने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात रॅली काढली जाते. तसेच शहरातील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चना केली जाते. त्यानुसार यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘जय श्रीराम’चा जयघोष करीत निघालेल्या या शोभायात्रेने शहर दुमदुमून गेले होते. त्याचप्रकारे सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस व नववर्ष असल्याने सिंधी समाजाचीही शहरात शोभायात्रा निघाली होती. हजारोंच्या संख्येत सिंधीबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेतील आकर्षक झाकींनी मन मोहून घेतले होते. सिंधी कॉलनीतून ढोल ताशांच्या गजरात नाचत गात निघालेली ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने गेली. शोभायात्रेत ‘आयो लाल झुलेलाल’चा गजर करीत सिंधी बांधवांनी एकमेकांना नववर्ष साई झुलेलाल यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
एकंदर शहर जय श्रीराम व जय झुलेलालच्या गजराने दणाणून गेला होता. (शहर प्रतिनिधी)