‘जय श्रीराम’च्या गजराने दुमदुमली तिरोडा नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 01:41 AM2016-04-17T01:41:36+5:302016-04-17T01:41:36+5:30
श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीच्यावतीने शहरात शुक्रवारी (दि.१६) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
विविध देखावे : धार्मिक व सामाजिक संघटनांचा सहभाग
तिरोडा : श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीच्यावतीने शहरात शुक्रवारी (दि.१६) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेची सुरुवात स्थानिक गजानन मंदिरातून करण्यात आली. शोभायात्रेत विविध देखावे, चित्ररथ तसेच डी.जे.ची व्यस्था करण्यात आली होती.
चित्ररथांमध्ये महाकालेश्वर भष्मआरतीचे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच दुर्गा वाहिणीच्या वतीने स्त्री शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. त्यात मुलींना पी.टी. उषा, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, दुर्गा, काली, मदर टेरेसा अशा विविध स्त्री शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले होते. भगवान परशुरामद्वारा मॉ ंरेणुकावर प्रहार, श्रावणबाळ आई-वडीलांची कावड घेवून तिर्थयात्रेस निघाला, गजानन महाराज यांच्या समोर क्रोधीत झालेली गाय शंत होतो तो चित्ररथ प्रसंग, तुळजापूरची भवानी देवीचे चित्ररथ आकर्षक होते. एकापेक्षा एक मनोविलोभनीय चित्ररथांची शोभायात्रा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
शोभायात्रा जाणाऱ्या रस्त्याने पाणी टाकून घरासमोर रांगोळ्या काढून शोभायात्रा व पालखीचे स्वागत घरोघरी होत होते. गजानन मंदिरातून सुरू होऊन शहराच्या मुख्य मार्गाने, सपना फॅशन, न.प. बगीचा, कहार मोहल्ला, जुनी बस्ती, ठाकूर मोहल्ला, गुरुदेव चौक, मोहनलाल चौक, पोलीस स्थानक, मुख्य चौक मार्गे गजानन मंदिर असा मार्ग क्रमण करीत शोभायात्रेचा समारोप गजानन मंदिरात करण्यात आला.
या शोभायात्रेदरम्यान स्वर्णकार सखी मंच तिरोडाच्यावतीने शेवचिवडा, मिसळचे पाकिट वितरण केले. ठाकूर मोहल्ला येथे अल्पाहाराचे वितरण, देवाजी निवडे यांचेतर्फे सरबतचे वितरण, बजरंग दल तिरोडा शाखेतर्फे आलूपोहा तसेच विविध सामाजिक संघटना व वैयक्तीकरित्या सुद्धा सरबत, नास्ता, फळांचे वितरण जागोजागी करण्यात आले होते.
शोभायात्रेत उत्स्फूर्त उत्साह दिसून येत होता तर डी.जे. वर रामधून, रामजी की निकली सवारी, जय श्रीराम च्या गजरावर तरुण नाचतगात होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित घटना घडली नाही.
यावर्षी समितीच्या वतीने बाहेरुन सुद्धा झॉकी, चित्ररथ बोलविले होते. ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढलेली दिसून आली. (तालुुका प्रतिनिधी)