जलयुक्त शिवार अभियानाची गती मंदावली
By admin | Published: February 22, 2017 12:18 AM2017-02-22T00:18:34+5:302017-02-22T00:18:34+5:30
दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावर्षी काहीशी संथगतीने होत आहेत.
दोन महिन्यांत फक्त १६ कामे : आतापर्यंत ४३.०१ टक्के कामांचा कार्यारंभ आदेश
गोंदिया : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावर्षी काहीशी संथगतीने होत आहेत. सन २०१५-१६ या वर्षात कामांना गती होती. त्यामुळे या अभियानातून चांगल्या गोष्टी समोर आल्या होत्या. पहिल्या वर्षात असलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले होते. परंतु सन २०१६-१७ या वर्षातील उद्दीष्ट साध्य करणे अशक्य होणार आहे. आतापर्यंत ४३.०३ टक्के कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले आहेत. ९.७८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात (सन २०१६-१७) मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये २ हजार ७४८ कामांचे सुधारित प्रारुप तयार करण्यात आले. यातील २ हजार ६१६ कामांवर खर्च होणारा बजेट तयार करण्यात आला. २ हजार ५९१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील १ हजार १८२ कामे आतापर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले.
परंतु फक्त ८०५ कामे सुरु करण्यात आले आहे. २६९ कामे पूर्ण झाले आहेत. यात कृषी विभागाचे २०, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे १५, पंचायत समितीचे २२ व लघु पाटबंधारे विभाग (पाणी) चे ९८ कामे प्रगती पथावर आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पावसाच्या पाण्याने भूगर्भ स्तर वाढवा
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून काम झाले आहेत. ज्या तालुक्यात ही कामे झाली. त्या तालुक्यात पाण्याची पातळी उंचावर आहे. त्या तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु अनेक तालुक्यातील पाण्याची पातळी खाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाबरोबरच पावसाचे पाणी जमीनित मुरावे यासाठी प्रयत्न केल्याशिवाय भुजल पातळी वाढणार नाही.
७८९६.८८ लाखांचा बजेट
जलयुक्त शिवार अभियानाचा सुधारित अहवाल तयार करण्यात आला असून कृषी विभागाच्या १ हजार ८४९ कामांवर ३५ कोटी ३५ लाख ३५ हजार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या २१२ कामांवर २३ कोटी १३ लाख ७३ हजार, जलसंधारणाच्या ३१ कामांवर ५९ लाख ८० हजार, वनविभागाच्या ५०२ कामांवर १० कोटी १० लाख ७९ हजार तर पंचायत समितीच्या १५८ कामांवर ४ कोटी ७७ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.