२७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:50 PM2018-05-09T21:50:05+5:302018-05-09T21:50:05+5:30
राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही. तब्बल २७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान मागासल्याचे चित्र आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये ९४, २०१६-१७ मध्ये ७७ व सन २०१७-१८ मध्ये ६३ गावांची निवड करण्यात आली होती. अभियानाला पहिल्या दोन वर्षांत मोठे यश मिळाले. मात्र यानंतर अभियानाची गती खूप मंदावली आहे.
मागील वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील १०-१०; देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील ७-७ तसेच आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ६-६ गावांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व निवडलेल्या गावांपैकी केवळ २६ गावांमध्येच १०० टक्के काम झाले आहे. १० गावांमध्ये ८० टक्के काम झाले आहे. तर २७ गावे असे आहेत, जेथील काम ५० टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातील दोन गावांत ३० टक्के, ८ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गोंदिया तालुक्यातील एका गावात अजुनही काम सुरू करण्यात आले नाही.
सन २०१७-१८ मध्ये १९९१ कामांना अभियानांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. यापैकी कृषी विभाग १४३८, जि.प. लघू सिंचन विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु १३५९ कामांना सुरूवात करण्यात आली. यात कृषी विभागाचे ९६८, जि.प. लघू सिंचन विभाग १४०, पंचायत समितीच्या ११७ कामांचा समावेश आहे.
जलसंधारण विभाग व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे आतापर्यंत काम सुरू करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आला नाही. दोन्ही विभागाद्वारे एकही काम करण्यात आला नाही. तर वन विभागाचे सर्व १३४ कामे सुरु आहेत.
वन विभागाचे ५० कामे पूर्ण झाले आहेत, तर ८४ कामे प्रगतीपथावर आहेत. कृषी विभागाचे ७११, जि.प. लघू सिंचन विभागाचे ४५, पंचायत समितीचे ११३ कामे पूर्ण झाले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये कृषी विभाग २५७, जि.प. लघू सिंचन विभाग ९५ व पंचायत समितीच्या ४ कामांचा समावेश आहे.
११.६३ कोटींचा झाला खर्च
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख १५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी कृषी विभागाद्वारे सर्वाधिक ५ कोटी ३० लाख १७ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभागाद्वारे ३ कोटी ६५ लाख ६९ हजार रूपये, पंचायत समितीद्वारे २ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांचा समावेश आहे. तर प्रस्तावित १९९१ कामांवर ७१ कोटी ८६ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहेत. यात कृषी विभाग ४२ कोटी ३३ लाख २९ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभाग १९ कोटी २५ लाख ४१ हजार रूपये, पंचायत समिती ५ कोटी ०८ लाख ५० हजार रूपये, जलसंधारण १ कोटी २१ लाख २४ हजार रूपये, वन विभाग ३ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ३८ लाख ०९ हजार रूपयांचा समावेश आहे.