जपानी मेंदूज्वराने मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:17 PM2019-02-11T22:17:49+5:302019-02-11T22:19:01+5:30
देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील १२ वर्षीय मुलाचा जपानी मेंदूज्वराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) घडली. शुभम उमेश रहिले (१२,रा.शिलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील १२ वर्षीय मुलाचा जपानी मेंदूज्वराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) घडली. शुभम उमेश रहिले (१२,रा.शिलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
शुभमला २९ जानेवारी रोजी ताप आला होता. घरच्यांनी त्याला उपचारासाठी देवरी येथील लक्ष्मीकांत चांदेवार या खासगी डॉक्टरकडे नेले होत व त्यांनी औषधोपचार केला. परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती खालावल्याने शुभमला २ फेब्रुवारी रोजी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर येथेही उपचार करण्यात आला. परंतु दोन दिवस उपचार करूनही प्रकृती बरी होत नसल्याने नागपूरला वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करतांना त्याला जापानी मेंदूज्वर असल्याचा संशय वैद्यकीय विभागाने व्यक्त केला. तसा अहवाल गोंदियाच्या आरोग्य विभागाला पाठविला. त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आला. परंतु उपचार घेतांना रविवारी (दि.१०) शुभमचा मृत्यू झाला. जापानी मेंदूज्वराने शुभमचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत त्या गावात सात दिवस शिबिर लावले. शिलापूर येथील लोकसंख्या ९१६ असून गावातील सर्व लोकांच्या रक्ताचे नमुने तपासण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी सांगितले.
लस घेतल्यावरही मृत्यू कसा?
जपानी मेंदूज्वर होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१४ ला विशेष मोहीम राबवून जापानी मेंदूज्वराची लस बालकांना लावली होती. त्यावेळी शुभम उमेश रहिले या मुलाने २०१४ ला शाळेतच ही लस घेतल्याचे चौकशीत आढळून आले. लस घेतल्यानंतरही त्याचा मृत्यू कसा झाला. हा मृत्यू जापानी मेंदूज्वरानेच किंवा इतर कारणामुळे झाला याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.