जातविरहित समाज देश विकासाला पोषक
By admin | Published: April 20, 2016 02:01 AM2016-04-20T02:01:37+5:302016-04-20T02:01:37+5:30
विकासाच्या वाटेवर देशाला मोठे करायचे असेल तर जातविरहित समाज घडविण्याची गरज आहे.
पालकमंत्री बडोले : प्रबोधन कार्यक्रमाचा समारोप
सालेकसा : विकासाच्या वाटेवर देशाला मोठे करायचे असेल तर जातविरहित समाज घडविण्याची गरज आहे. आज आपल्या देशातील लोक समाजात जातीत विभागले असून जातीचे विभाजन समाजाला व देशाला नेहमी घातक ठरत राहील. परिणामी देशाची प्रगती बाधीत होत राहिल. खऱ्या अर्थाने देशाला आर्थिक, सामाजिक, समता, बंधुत्व आणून देशाला मोठे बनविण्यासाठी जातविहरीत समाज पोषक ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथे १७ एप्रिल रोजी चार दिवसीय प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपीय सभारंभात अध्यक्षीय भाषण देताना लोकांना संबोधित करीत होते.
तालुक्यातील आमगावखुर्द येथील नागार्जुन बौद्ध विहार समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून आयोजीत प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.१७) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरत बहेकार, पंचायत समिती माजी सभापती राकेश शर्मा, जिल्हा परिषद सभापती देवराज वडगाये, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा संयोजक प्यारेलाल जांभुळकर, प्रमोद संगीडवार, परसराम फुंडे, बाबुलाल उपराडे, संगीता शहारे, सुदेश जनबंधू, समितीचे अध्यक्ष खेमराज साखरे, सरपंच योगेश राऊत, राजेंद्र बडोले, विरेंद्र अंजनकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, बाबासाहेबांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक चटके सहन केले. मोठा संघर्षमय सामाजिक लढा दिला. त्यातून त्यांनी येणाऱ्या पिढीसाठी अनेक विचारांना जन्म दिला. त्यांचे हे विचार पिढ्यानपिढ्या समाजासाठी उपयोगी पडत राहणार आहेत. म्हणून आज बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करुन सामाजिक क्रांती घडविण्याची गरज आहे. त्यातूनच समाज बलशाली होऊ शकतो असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी अनेक योजनांची माहिती देत येणाऱ्या काळात सामाजिक न्याय विभाग कोण-कोणते उपक्रम राबविणार याबद्दल सांगितले.
दरम्यान आमदार पुराम व माजी मंत्री बहेकार यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात खेमराज साखरे यांनी तालुक्यातील अनुसूचित जातीसह इतर बाबतीत अनेक आवाहने काय आहेत याची जाणीव करुन दिली.
संचालन कैलास गजभिये यांनी केले. आभार निर्दोष साखरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ललीता वैद्य, प्रतिभा साखरे, वर्षा मेश्राम, युवराज लोणारे, मनिषा साखरे, सुजीत बन्सोड, गुणीलाल राऊत, संतोष देऊळकर, अनिल तिरपुडे, माणिक डोंगरे, भीमराव भास्कर, शामराव टेंभुर्णीकर, सतिष करकाडे, शोभाराम शहारे, रेखा डोंगरे, वंदना अंबादे, जयकुमार राऊत, शुभम सहारे, अनिल सोनटक्के यांच्यासह तालुक्यातील इतर गावातील बौद्ध उपासक-उपासिकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)