जिल्ह्यात धान लागवडीला ज्वारीचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 08:12 PM2018-12-25T20:12:34+5:302018-12-25T20:14:25+5:30
निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाचे तज्ञ सुध्दा पीक लागवड पध्दतीत बदल करण्याचा सल्ला देत आहे. याच दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात धानाऐवजी ज्वारीची लागवड येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला ज्वारीच्या रुपाने पर्याय मिळणार आहे.
धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून खरीपात १ लाख ७५ हजार तर रब्बीेमध्ये ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी धानाची लागवड करीत असल्याने हळूहळू धानाच्या उत्पादनात घट होत आहे. परिणामी लागवड खर्चात सुध्दा वाढ होत असल्याने शेतकºयांना धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली आहे. यालाच पर्याय म्हणून कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी १३ कृषी अधिकारी कार्यालयांना प्रत्येकी १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट दिले असून त्यासाठी लागणारे बियाणे सुध्दा उपलब्ध करुन दिले. धान उत्पादक शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड करावी, यासाठी शेतकºयांना प्रती हेक्टरी १० किलो ज्वारीचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. धानापेक्षा ज्वारी पिकाला पाणी कमी लागत असून त्याचा लागवड खर्च सुध्दा कमी आहे. शिवाय यामुळे जनावरांसाठी चारा सुध्दा उपलब्ध होईल.
पीक लागवड पध्दतीत बदल केल्याने जमिनीची खालावत चाललेली पोत सुधारण्यास मदत होईल. केंद्र शासनाने सन २०१८-१९ हे वर्ष पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. त्यात रब्बी तृण धान्य पिकांची लावगड व उत्पादन घेण्याचे प्रस्तावित केले आहे. कृषी विभागाने राबविलेला ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्वारीच्या रुपाने पर्याय उपलब्ध होणार आहे.
पौष्टिक अन्न व चारा उपलब्धता
जिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पशूधन असून मे २०१९ अखेर २ लाख ५४ हजार ५२९ मे.टन संभाव्य चारा टंचाई दिसून येत आहे. अशात ज्वारीच्या लागवडीमुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता होणार आहे. शिवाय पीक पद्धतीत बदलामुळे रब्बी पीक क्षेत्रात वाढ होणार असून ज्वारीच्या माध्यमातून पौष्टीक अन्न घटक उपलब्धत होणार आहे.
यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.
- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.