तंबाखू खाणाऱ्यांचा जबडा झाला जाम! तंबाखूमुळे ७५१ जणांचे तोंड उघडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 04:35 PM2024-12-05T16:35:56+5:302024-12-05T16:36:48+5:30
महिन्यातून एकदा तपासणी करा : १९ जणांना मुख कर्करोग
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तंबाखू, सिगारेट सेवन करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या अनेक दुष्परिणामांचा सामनाही अनेक नागरिकांना करावा लागत आहे. तंबाखूमुळे कर्करोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सन २०२४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांच्या काळात गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्या १९ जणांना तोंडाचा कर्करोग झाला आहे.
गोंदिया जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांत १९ जणांना तोंडाचा कर्करोग आढळला आहे. तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने तोंडाचा कर्करोग, ओठांचा, जबड्यांचा, फुप्फुसांचा, घशाचा, पोटाचा, तसेच मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. त्यामुळे तंबाखू सेवनापासून नागरिकांनी दूर राहावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली.
१६ हजार १२१ जणांची तपासणी
जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या नऊ महिन्यांत गोंदिया जिल्ह्यातील तंबाखू खाणाऱ्या १६ हजार १२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात १९ जणांना तोंडाचा कर्करोग आढळल्याचे पुढे आले आहे.
गुटखाबंदी कागदावरच
कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे; परंतु आजही मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी खुलेआम गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे. या अवैध गुटखा विक्रीवर प्रशासना- कडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गुटखाबंदी ही नावालाच असल्याचे चित्र आहे.
१९ जणांना तोंडाचा कर्करोग
गोंदिया जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांत १९ जणांना तोंडाचा कर्करोग आढळला आहे. कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत.
७५१ जणांचे तोंड उघडेना
मागील नऊ महिन्यांत तंबाखू खाणाऱ्या १६ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यात ७५१ लोकांचे तंबाखूमुळे तोंडच उघडत नव्हते. हे रुग्णदेखील कर्करोग होण्याच्या मार्गावर आहेत. तोंड न उघडणे हे कर्करोगाचे पूर्व लक्षण आहे.
महिन्यातून एकदा तपासर्णी हवीच
आपण तंबाखू, गुटखा खात असाल तर प्रत्येक महिन्याला आपली आरोग्य तपासणी करून घ्या. आपल्याला कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वेळोवेळी तपासणी केली, तर त्याचे वेळीच निदान होऊ शकते अन्यथा आपल्याला धोका उद्भवू शकतो.
"जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २००३ कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यात केली जाते. पानटपरीची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आता शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली."
- डॉ. अनिल आटे, जिल्हा मौखिक अधिकारी, गोंदिया.