शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक
By नरेश रहिले | Published: November 22, 2023 07:18 PM2023-11-22T19:18:02+5:302023-11-22T19:18:15+5:30
शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले.
गोंदिया: शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मामा चौकातील खडे हनुमान मंदिराजवळ, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) या शिक्षकाच्या घरून इंटरलॉक तोडून घरातून रोकड, मंगळसूत्र चोरी १६ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजता केली होती. या प्रकरणात आरोपी विकास बळीराम बुराडे ऊर्फ कालू (२५) रा. विजयनगर, मरारटोली, गोंदिया याला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून ५० हजाराचा माल जप्त केला आहे.
शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले. घरातील बेडरूममध्ये असलेल्या आलमारीचे कुलूप तोडून त्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख २० हजार रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात बावनकुळे यांनी गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस हवालदार लुटे, पोलिस शिपाई रहांगडाले, चालक पोलिस शिपाई पांडे, कुंभलवार यांनी यांनी केली आहे.
घरात लपविले चोरी केलेले साहित्य
आरोपी विकास बळीराम बुराडे ऊर्फ कालू (२५) रा. विजयनगर, मरारटोली, गोंदिया याने चोरी केलेले साहित्य हे आरोपीने आपल्या घरी लपवून ठेवले होते. त्याच्या घरून मंगळसूत्र १ तोळा वजनाचा किंमत ४० हजार, ५०० रूपयाच्या ४ नोटा किंमत २००० हजार, २०० रूपयांच्या ८ नोटा किंमत १ हजार ६०० रूपये, १०० रूपयाच्या ७० नोटा किंमत ७ हजार रुपये रोख असा एकूण ५० हजार ६०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.