काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास
By नरेश रहिले | Published: December 1, 2023 06:22 PM2023-12-01T18:22:21+5:302023-12-01T18:23:19+5:30
गोंदिया : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिले नसल्याचे यातून दिसून येत आहे. ...
गोंदिया : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिले नसल्याचे यातून दिसून येत आहे. मात्र, चोरट्यांच्या नजरेतून पोलिस देखील सुटले नसून त्यांच्या घरावर देखील चोरटे हात साफ करीत आहेत. याचीच प्रचिती शहरातील गौतमनगर येथील घटनेतून आली असून, चोरट्यांनी पोलिसाच्या घरातूनच २.२१ लाखांचे दागिने लंपास केले.
शहरातील बाजपेयी वाॅर्ड आंबेडकर वाॅर्ड स्कूलच्या पाठीमागे असलेल्या गौतमनगर परिसरातील रहिवासी पोलिस कर्मचारी प्रदीप कृष्णबिहारी मिश्रा यांच्या घरातून २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी दोन लाख २१ हजार १०० रुपयांचे दागिने लंपास केला. चोरीला गेलेल्या दागिन्यात १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किंमत ४८ हजार रुपये, १३ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किंमत ५२ हजार रुपये, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा पांचाळी हार किंमत ४० हजार रुपये, प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या किंमत ६० हजार रुपये, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची एक नथ किंमत १२ हजार रुपये व २०० ग्रॅम वजनाच्या पायल किंमत नऊ हजार १०० रुपये यांचा समावेश आहे. या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.