जिजाऊ आरोग्य व पोषण मिशनचा बट्ट्याबोळ
By admin | Published: September 9, 2014 11:35 PM2014-09-09T23:35:12+5:302014-09-09T23:35:12+5:30
काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै
नामदेव हटवार - सालेकसा
काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै २०१४ मध्ये प्रत्येक महिन्यात जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत कमी वजनाची बालके दिसून येत आहेत. यावरुन एकात्मिक बाल व महिला प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून योग्य नियोजन व काम होत नसल्याचे दिसून येत आहे.
सालेकसा तालुक्यात प्रत्येक महिन्यात कुपोषणाची स्थिती आढळून आलेली आहे. जुलै महिन्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील ८०१७ बालकांपैकी ६७४९ बालके साधारण श्रेणीत होती. ९५५ बालके कमी वजनाची तर १८७ बालके ही तीव्र कुपोषीत होती. तालुक्यातील सर्वच बिटमध्ये कमी वजनाची बालके भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत. काही बिटांचा सर्वे केला असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली.
शासनाने महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषन निर्मुलनासाठी विविध मार्गानी प्रयत्न चालविले असूनही अजून लोकांना पहिल्या २ वर्षातील आहाराचे महत्व कळलेले नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या अजुनही कायम आहे. त्यात मुख्यालयात पर्यवेक्षिका राहत नसून बाहेरील गावावरुन ये-जा करीत असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात अंगणवाडीला भेट देणे बालकांची माहिती घेणे जास्त प्रमाणात हात नाही.
महिन्याची आकडेवाडी जमा करणे व ती कार्यालयात जमा करणे ही बाब आज नित्यनेमाने सुरु असते. याचाही परिणाम तीव्र कुपोषणावर होऊ शकतो.
कुपोषणमुक्त अभियान राबवित असताना प्रत्येक प्रकल्पात सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या फक्त ३ अंगणवाड्यांना पुरस्कार देण्याचे काम राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानात करण्यात आले होते. पण सालेकसा तालुक्यातील एकही अंगणवाडी मात्र ठरलेली नाही.
कुपोषणमुक्त करण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानात जे विविध उपक्रम राबविण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचा उपयोग महिला व बाल प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून, पर्यवेक्षिकाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिलांमध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेलीच नाही. अंगणवाडी सेविका व मदतगीस आपल्या स्तरावर स्थानिक पातळीवर राहत नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव तेवढा पडत नाही.