आदिवासी विद्यार्थ्यांची थट्टा
By admin | Published: January 17, 2015 11:01 PM2015-01-17T23:01:24+5:302015-01-17T23:01:24+5:30
आदिवासी युवक-युवतीकरिता रोजगार व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे बऱ्याच वर्षापासून देवरी येथे सुरू असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडून आदिवासी
सुशील जैन - देवरी
आदिवासी युवक-युवतीकरिता रोजगार व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे बऱ्याच वर्षापासून देवरी येथे सुरू असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडून आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. आ.संजय पुराम यांच्या आकस्मित भेटीत हा प्रकार उघडकीस आला.
आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ४० विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग या केंद्राद्वारे चालविले जातात. शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रतिमाह एक हजार रुपये विद्यावेतन देण्याची तरतूद आहे. परंतु मागील पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात आले नाही. येथे विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान व बुद्धीमत्ता हे चार विषयांचे शिकवणी वर्ग शिकविले जातात. हे विषय शिकविणाऱ्या अध्यापकांनासुद्धा आॅगस्ट २०१४ पासून पगार देण्यात आले नाही. या कार्यालयात आठ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. परंतु अधिकांश वेळेत केवळ चपराशीच येथे हजर असतो.
याबाबतच्या तक्रारी कळताच आ. संजय पुराम यांनी १५ जानेवारीला दीड वाजता या कार्यालयात आकस्मिक भेट दिली. त्या वेळेस एकही विद्यार्थी हजर नव्हता. कार्यालय अधिकारी व एक चपराशी फक्त येथे हजर होते. आमदारांनी भेट पुस्तिका मागितली असता ती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पाच महिन्यांपासून विद्यावेतन देण्यात आले नाही. तसेच शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना सुद्धा मागील पाच महिन्यांपासून मानधन देण्यात आले नसल्याचे आढळले. आदिवासी विद्यार्थ्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेची पुस्तके येथे उपलब्ध नाहीत. तसेच तज्ज्ञ शिक्षकांचा अभाव असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले.
विशेष म्हणजे या कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हा पातळीवर या विभागाचे कार्यालय नाही. विभागीय कार्यालय नागपूर येथे असल्याने या कार्यालयावर कोणत्याही अधिकाऱ्यांचे वचक नाही. येथे कार्यरत असलेले अधिकारी बी.एच. डोंगरे हे येत्या ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत असल्याचे त्याचे सुद्धा या कार्यालयाकडे दुर्लक्ष आहे. वरीष्ठ अधिकारी इकडे भटकत नसल्याचे कर्मचारी येथे हजर राहत नसल्याचे उघडकीस आले आहे.
फक्त एका चपराशाच्या भरवश्यावर हे कार्यालय चालत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आमदारांनी कार्यालय अधिकारी डोंगरे यांची चांगलीच कानउघाडणी केली व नंतर प्रभारी उपसंचालक डी.एम. गोस्वामी नागपूर यांच्याश्ी दुरध्वनीवर बोलून या कार्यालयातील गौडबंगालाची माहिती देऊन त्वरित कार्यालयाला भेट देण्याची सूचना केली.
यापूर्वी २०१० मध्ये उपसंचालक मेंडके यांनी या कार्यालयाला एकदा भेट देऊन वर्षभरात तीन भेटी दाखविल्याचे मस्टर पाहिल्यावर समजून आले. विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील रोजगार व स्वयंरोजगार केंद्रावर आदिवासी युवक-युवतींना पाहिजे तसे ज्ञान प्राप्त होत नसून रोजागाराच्या नावावर आदिवासीची थट्टा या कार्यालयाकडून होताना दिसून येत आहे.