उन्हाळी प्रवासासाठी आरक्षणावर उड्या
By admin | Published: April 19, 2015 12:53 AM2015-04-19T00:53:33+5:302015-04-19T00:53:33+5:30
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. सुट्ट्यांमध्ये विविध पर्यटनस्थळी जाण्याची अनेकांची योजना असते.
गोंदिया रेल्वे स्थानक : १५ दिवसांत १३ हजार ३७१ बुकिंग
देवानंद शहारे गोंदिया
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. सुट्ट्यांमध्ये विविध पर्यटनस्थळी जाण्याची अनेकांची योजना असते. यावर्षीच्या रेल्वे बजेटनेसुद्धा चार महिन्यांपूर्वी रेल्वे प्रवास आरक्षण केले जावू शकण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर १ ते १५ एप्रिल २०१५ पर्यंत केवळ १५ दिवसांच्या कालावधीत गोंदिया रेल्वे स्थानकात एकूण १३ हजार ३७१ जणांनी विविध स्थळी जाण्यासाठी रेल्वे प्रवास आरक्षित केले आहे.
विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी असते. शिवाय इतर लोकांचीही उन्हाळ्याच्या दिवसात थंड ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याची योजना असते. पचमठी, महाबळेश्वर, खंडाळा, पुणे, गोवा, पाचगणी आदी अनेक ठिकाणी जावून उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटला जातो. तर काहींची योजना धार्मिक तिर्थस्थळांचे दर्शन घेण्यासाठी असते. त्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकातून १ ते १५ एप्रिलपर्यंत १३ हजार ३७१ एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट १० रूपये असली तरी गोंदिया जवळील रेल्वे स्थानक गुदमा, गंगाझरी, गात्रा, प्रतापबाग, नागराधाम, गणखैरा व हिरडामाली स्थानकांचे तिकीट दर केवळ पाच रूपये आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जाणारे १० रूपयांची तिकीट न घेता सदर रेल्वे स्थानकांचे पाच रूपयांचे तिकीट घेतात.
या प्रकारामुळे पाच रूपये प्रवास दर असलेल्या या रेल्वे तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यांना जवळील रेल्वे स्थानकांचे पाच रूपये तिकीट दर असल्याचे माहीत आहे, ते १० रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी न करता जवळील रेल्वे स्थानकाचे पाच रूपयांचे तिकीट खरेदी करून प्लॅटफॉर्मवर वावरतात. ते प्रवास करीत नसले तरी सदर प्रवासी तिकिटामुळे त्यांना प्लॅटफॉर्मवर राहण्याची सुट मिळते.
रेल्वे बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट दर पाच रूपयावरून १० रूपये करण्यात आली. अचानक झालेली ही दुप्पट वाढ स्वीकार करण्यास नागरिकांची मानसिकता तयार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ते १० रूपयांची प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी न करता सरळ जवळील रेल्वे स्थानकाची तिकीट घेवून प्लॅटफॉर्मवर जातात.
प्लॅटफार्म तिकीटपेक्षा प्रवास तिकीट स्वस्त
रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्लॅटफॉर्मचे दर पाच रूपयावरून वाढवून १० रूपये केली आहे. परंतु १० रूपयांची प्लॅटफॉर्म तिकीट काहींना परवडण्यासारखे नसते. याचा विकल्प म्हणून पाच रूपये प्रवास तिकीट असलेल्या जवळच्या स्थानकाचे तिकीट घेवून प्रवास न करता प्लॅटफॉर्मवर थांबले जाते. या प्रकाराने ते प्रवास करीत नसले तरी त्यांची पाच रूपयांची बचत होते.